

पुणे: शिक्षणनगरी, सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे आता 'अनुभवाधारित सांस्कृतिक पर्यटन' या नव्या ट्रेंडमुळे देश-विदेशांतील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यापुरते पर्यटन मर्यादित न राहता शहराची संस्कृती, परंपरा, कला, संगीत, नाटक, उत्सव, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक जीवनशैली अनुभवण्याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम रील्स, यू-ट्युब व्लॉग्स, ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि डिजिटल कंटेंटमुळे 'अनुभवायचं पुणं' ही संकल्पना अधिक लोकप्रिय होत असून, सांस्कृतिक ठेवा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले पुण्याकडे वळत दिसत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत पुण्यामध्ये सांस्कृतिक उपक्रमांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्षभरात सुमारे पाच हजारांहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम-महोत्सव होत आहेत. संगीत मैफिली, नाट्यप्रयोग, साहित्य संमेलने, कविसंमेलने, चित्रप्रदर्शने, पुस्तक प्रकाशन सोहळे, चित्रपट महोत्सव, लोककला महोत्सव, नृत्य महोत्सव आणि विविध कलाविषयक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
त्यामुळे देशभरातील रसिक, कलाकार आणि परदेशी पर्यटकही पुण्याकडे आकर्षित होत आहेत. पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली असून, जुन्या पेठांमधील वाडा संस्कृती, पारंपरिक बाजारपेठा, पुणेरी खाद्यसंस्कृती, सामाजिक सुधारणांचा इतिहास आणि शहराची वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली अनुभवण्यासाठी पर्यटक उत्सुक असल्याचे चित्र आहे.
पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यावर पर्यटक भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध संस्था, इतिहास अभ्यासक आणि वास्तुतज्ज्ञांकडून हेरिटेज वॉक आयोजित केले जात आहेत. सोशल मीडियामुळे पुण्याच्या सांस्कृतिक पर्यटनाला सर्वाधिक चालना मिळाली आहे. त्यासाठी अनेक कंटेंट क्रिएटर्स आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स काम करत आहेत. सांस्कृतिक पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक वीरेंद्र चित्राव म्हणाले, पर्यटक आता केवळ ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येत नाहीत, तर शहराची संस्कृती, परंपरा अनुभवण्यासाठी देश-विदेशांतून येत आहेत. सांस्कृतिक उपक्रमांना प्रतिसाद आहे. राज्य सरकारने सांस्कृतिक पर्यटनासाठी स्वतंत्र धोरण आखून योग्य नियोजन केले, तर पुणे जागतिक दर्जाचे सांस्कृतिक पर्यटन केंद्र बनू शकते.
'अनुभवायचं पुणं' संकल्पना का ठरतेय लोकप्रिय?
वर्षभर ५ हजारांहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव
नियमित हेरिटेज आणि फूड वॉक
वैशिष्ट्यपूर्ण पुणेरी खाद्यसंस्कृती
सोशल मीडियावर वाढती प्रसिद्धी
देश-विदेशांतील पर्यटकांचा वाढता प्रतिसाद
पुणे हे आजही देशातील सर्वाधिक सांस्कृतिकदृष्ट्या सक्रिय असलेले शहर आहे. वर्षभरात अंदाजे पाच हजारांहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम-महोत्सव पुण्यात आयोजित केले जात आहेत. वर्षभर होणारे संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट आणि विविध कला महोत्सवाला देशभरातील कलाकार आणि रसिक पुण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची वाढ ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, ती पुण्याच्या सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणारी ठरत आहे.
सुनील महाजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक