शिरूर : पुढारी वृत्तसेवा
रुग्ण तपासण्याच्या बहाण्याने शिरूर येथील एका नामांकित डॉक्टरचे अपहरण करुन तीन लाखाची खंडणी घेतल्याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी डॉ. संदीप तुळशीराम परदेशी (वय 59, रा. यशोदीप मारुती आळी शिरूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी कुणाल सुभाषसिंग परदेशी (रा. शिरूर) यास अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. याप्रकरणी कुणाल सुभाषसिंग परदेशी यांच्यासह अन्य सात जणांविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ४) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास यातील काही आरोपींनी आजीच्या आजारपणाचा बहाणा करून डॉ. परदेशी यांना बोलावून घेतले व पुढे जाऊन एका पांढऱ्या रंगाच्या मारुती 800 (नंबर नसलेली गाडी) मध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना मारुती गाडीत बसवून नेत असताना डॉ. परदेशी यांनी सुटकेसाठी प्रयत्न केला; मात्र संशयीत आरोपांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून शांत बसण्यास सांगितले. त्यानंतर संशयित आरोपांनी डॉ. परदेशी यांना कर्डे (ता. शिरूर) येथील घाटात नेउन तेथे त्यांना मारहाण करत बांधुन ठेवले व खंडणीची मागणी केली.
यानंतर डॉ. परदेशी यांनी जीव वाचवण्याच्या दृष्टीने आपल्या चालकाला फोन करुन पैसे घेउन येण्यास सांगितले. या चालकास अपहरणकर्त्यांनी शिरूर-अहमदनगर हद्दीवरील सतरा कमानी पुलाजवळ रक्कम आणून देण्यास सांगितली. त्याठिकाणी रक्कम दिल्यानंतर डॉ. परदेशी यांना सोडुन देण्यात आले. मात्र त्याआधी खंडणी वसुलीसाठी त्याना जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या खिशातील रोख १५ हजार रुपये तसेच गाडीच्या चाव्या व अन्य साहित्य हिंसकावून घेतले. या प्रकरणी शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण उंदरे करीत आहेत.
हेही वाचा