मोगरा फुलला ! लतादीदींची सोलापुरातील अविस्मरणीय आठवण | पुढारी

मोगरा फुलला ! लतादीदींची सोलापुरातील अविस्मरणीय आठवण

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : लतादीदींच्या आयुष्यातल्या पहिल्या क्लासिकल गाण्याचं सादरीकरण सोलापुरात झालं होतं . यासंदर्भात त्यांनी एक आठवण ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केली होती. फोटो पाहून त्यांनाही विश्वास बसेना! असे त्या पोस्टमध्ये त्या म्हणतात.!

भारतरत्न लता मंगेशकर या सोशल मीडियावर सक्रिय असायच्या. त्यांनी एक खास आठवण आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं क्लासिकल सादरीकरण हे सोलापुरात केलं असल्याचं सांगितलं आहे.

आपल्या सुरेल ,स्वप्नील आणि तरल आवाजाच्या किमयेने केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील गानलुब्ध रसिकांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या लताजींचा पहिला जाहीर कार्यक्रम सोलापुरात सरस्वती चौकाजवलील चंचलादेवी गांधी यांच्या घराच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानावरील निरागस नाट्य मंदिरात झाला ही सोलापूरकरांच्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. माझ्या गाण्याची सुरुवात मी 9 ते 10 वर्षाची असताना सोलापुरात झाली. या लताजींच्या सोलापुरातील पार्क मैदानावर 16 फेब्रुवारी 1994 रोजी झालेल्या सत्कार समारंभातील वाक्याला हजारो रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त दाद दिली होती.

जेष्ठ नेते शरद पवार , सुशीलकुमार शिंदे , विजयदादा मोहिते पाटील व तत्कालीन महापौर मनोहर सपाटे यांच्या उपस्थितीत सोलापूर पालिकेतर्फे चांदीच्या करंडकात मानपत्र देऊन लतादीदींचा गौरव करण्यात आला होता.

माझ्या जीवनातील सोलापुरात झालेल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात खंबावती रागातील चिजा व दोन नाट्यगीते गाऊन मी विंगेत आईच्या मांडीवर जाऊन झोपले अशी आठवण सांगताना लतादीदीं भारावून गेल्या होत्या.

लता दिदींच्या 1938 मध्ये सोलापुरात झालेल्या कार्यक्रमाचे वर्णन करताना मूळचे सोलापूरचे प्रख्यात बासरी वादक कै. अरविंद गजेंद्र गडकर यांनी 28 सप्टेंबर 2003 रोजी एका कार्यक्रमात आठवण सांगतली होती. ते म्हणाले होते, सोलापूरच्या एका बंगल्याच्या मोकळ्या जागेत कनाती बांधून तात्पुरते थिएटर उभारले होते. तिथेच एका रात्री मास्टर दीनानाथ यांची रागदारीची आणि नाट्यसंगीताची मैफिल कुणीतरी ठरवली होती. गाण्याची साथ लता मंगेशकर असे ठळक अक्षरात लिहिले होते. तिकीट होते फक्त आठ आणे.

या कार्यक्रमासाठी माझ्या वडिलांबरोबर मी पण गेलो होतो. थिएटर भरले होते पडदा उघडला, दीनानाथ यांच्या मागे कटकोळी पण तेजस्वी डोळ्यांची लता तंबोरा घेऊन बसली होती. दोन्ही खांद्यावरून भरगच्च लांब केसांच्या दोन वेण्या जमिनीपर्यंत आल्या होत्या. परकर पोलके घातलेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र ओसंडून वाहत होता.

मास्टर दीनानाथ यांचा आवाज लगत नव्हता ते विलक्षण थकलेले दिसत होते. त्यामुळे आवाज नीट लागत नव्हता. एक दोन रागातल्या चिजा, एक नाट्य पद त्यांनी कसेबसे सादर केले. दीनानाथ यांनी माल कंस राग गायला.

त्यांचा आवाज वर जाईना ते बाजूला झाले. लतादीदी ना पुढे यायची खूण केली आणि म्हणाले आता हिचे गाणे सुरू होईल. लता सरसावून बसली आणि तिने पहिलाच स्वर असा लावला की, ते सगळे दरिद्री मरगळलेले सभागृह सोनेरी चैतन्यने झगमगू लागले वाहवा, बहोत खूब ची बरसात होऊ लागली. दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आवाज म्हणजे काय असतो, याचा सर्वांना घडलेला तो साक्षात्कार होता, थरारून टाकणारा.! क्षणात दिव्यत्वाचे दर्शन घडवणारा सुरेल सर्वांगसुंदर सोनेरी साक्षात्कार.!

मघाशी एवढीशी दिसणारी चिमुरडी लता आता अभाळहून मोठी दिसत होती. तो दिवस, स्वरानुभव सर्वांच्या अंतःकरणावर कायमचा कोरला गेला. सोलापुरातील सत्काराच्या कार्यक्रमात लता दीदींनी मोगरा फुलला , मोगरा फुलला हे गीत सुरेल आवाजात गाऊन सर्वांची दाद घेतली.

हेही वाचा

Back to top button