शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांना घरघर, बी.एड-एम.एडला पसंती कमी Pudhari
पुणे

Education Degree Admissions: शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांना घरघर, बी.एड-एम.एडला पसंती कमी

शिक्षक भरती ठप्प, कंत्राटी नोकरीमुळे विद्यार्थ्यांचा ओढा घटला; हजारो जागा रिक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शाळांमध्ये होत नसलेली शिक्षक भरती, क्रीडा शिक्षकांच्या भरल्या जात नसलेल्या जागा आणि कंत्राटी किंवा हंगामी शिक्षकांच्या माध्यमातून संस्थास्तरावर होत असलेली पिळवणूक यामुळे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांना यंदा घरघर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून बी.पीएड., एम.एड. अभ्यासक्रमांना उपलब्ध जागांएवढी देखील नोंदणी झालेली नाही. तर प्रवेशाच्या कॅपच्या फेऱ्या संपूनही महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची धावपळ करावी लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच यंदा शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेतील सगळ्या फेऱ्या झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)

बी.एड. प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 481 महाविद्यालये सहभागी झाली असून, त्यात प्रवेशासाठी एकूण 36 हजार 553 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 76 हजार 432 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 72 हजार 426 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. तर 43 हजार 108 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय भरले होते. परंतु आत्तापर्यंत केवळ 21 हजार 929 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर प्रवेशाच्या अद्यापही 14 हजार 624 जागा रिक्तच आहेत. लवकरच संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

एम.एड. प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 55 महाविद्यालये सहभागी झाली असून, प्रवेशासाठी एकूण 2 हजार 925 जागा उपलब्ध आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत

2 हजार 495 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 294 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 1 हजार 526 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 1 हजार 399 जागा रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एम.पी.एड्‌‍. प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 32 महाविद्यालये सहभागी झाली आहेत. एकूण 1 हजार 15 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 1 हजार 687 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 1 हजार 609 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 881 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 134 जागा रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बी.ए. बी.एड्‌‍. आणि बी.एस्सी. बी.एड्‌‍. या एकात्मिक अभ्यासक्रमांसाठी 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर 355 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. यामध्ये बी.ए-बी.एड अभ्यासक्रमाची पाच महाविद्यालये सहभागी झाली आहेत. यामध्ये अभ्यासक्रमाच्या 353 जागा उपलब्ध आहेत. त्यातील 215 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून 138 जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी 55 पैकी 16 च प्रवेश-

बी.एड्‌‍. एम.एड्‌‍. या तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी यंदा एका महाविद्यालयात 55 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 424 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 312 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. परंतु 55 जागांपैकी केवळ 16 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशाच्या 39 जागा अद्यापही रिक्तच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षणशास्त्र शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना घरघर लागली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बी.पी.एड्‌‍.च्या 6 हजार 175 पैकी 2 हजार 662 जागा रिक्तच

बी.पी.एड्‌‍. प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 57 महाविद्यालये सहभागी झाली आहेत. एकूण 6 हजार 175 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत 4 हजार 557 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली होती. त्यापैकी 4 हजार 324 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत 3 हजार 513 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशाच्या अद्यापही 2 हजार 662 जागा रिक्तच आहेत. बी.पी.एड प्रवेशासाठी यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत नोंदणीच कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT