

पुणे : राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा पिकांना बसला आहे. तर, बहुतांश ठिकाणी शेतमालाची तोड रखडली आहे. याखेरीज, पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतमालाच्या गाड्या रस्त्यात अडकून पडल्याने त्याचा परिणाम गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागातील शेतमालाच्या आवकेवर झाला आहे. रविवारी बाजारात अवघ्या 80 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने सातारी आले, भेंडी, टोमॅटो, कोबी, ढोबळी मिरची आणि मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.(Latest Pune News)
नवरात्रोत्सव सुरू असल्याने बाजारात बटाटा, हिरवी मिरची, रताळी, भुईमूग, भेंडीसह राजगिऱ्याच्या भाजीला वाढलेली मागणी कायम आहे. पावसामुळे खरेदीदारही खरेदीसाठी बाहेर न पडल्याने आवक घटूनही बहुतांश फळभाज्यांचे भाव गत आठवड्याच्या तुलनेत टिकून होते, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश मध्यप्रदेश हिरवी मिरची 24 ते 25 टेम्पो, इंदौर येथून गाजर 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 2 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 150 ते 160 क्रेट, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, गुजरात येथून भुईमूग 5 ते 6 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 ते 40 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 6 ते 7 हजार क्रेट, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, भुईमुग शेंग 50 गोणी, मटार 400 ते 500 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 50 ते 60 ट्रक, स्थानिक भागातून बटाटा 2500 गोणी इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्या कडाडल्या
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक रोडावली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या पालेभाज्यांमध्ये पावसाने मार खाल्लेल्या पालेभाज्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. घाऊक बाजारात रविवारी (दि. 28) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 50 हजार जुडी, तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली होती. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर राहिली तर, मेथीची आवक वीस हजार जुड्यांनी वाढली. यामध्ये, दर्जाहिन पालेभाज्यांचे प्रमाण जास्त राहिले. बाजारात आवक कमी झाल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात शेकडा 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या एका गड्डीला 5 ते 25 रुपये इतका दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात 10 ते 30 रुपये दराने विक्री सुरू होती.