पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर बावधन येथील हवेली नंबर 4 येथील निलंबित सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व दस्तांची नोंदणी तपासणी करण्याचे आदेश सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी सह जिल्हा निबंधकांना दिले आहेत.
मुंढवा येथील शासकीय जमिनी गैरव्यवहार प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची नियम डावलून काम करणे, शासनाचा महसूल बुडविणे आदी प्रकरणात यापूर्वीच खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. तारू हे बावधन येथील हवेली 4 मध्ये सह दुय्यम निबंधक म्हणून फेबुवारी 2023 पासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या बाबतीत तक्रारी आल्यानंतर त्यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली होती.
तसेच त्यांनी पदभार घेतल्यानंतरच्या तीन महिन्यातील दस्तांचीही तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीमध्ये नियमांना बगल देऊन दस्तनोंदणी करणे, शासनाच्या नियमानुसार मुद्रांक शुल्क आकारण्याऐवजी कमी मुद्रांक शुल्क आकारून महसूल बुडविणे, आदी प्रकार उघडकीस आले होते. या गैरप्रकारात त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वी दिले होते. असे असताना मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणातही तारू यांनी नियमांचा भंग करून दस्तनोंदणी केली असल्याचे उघड झाले.
तसेच या प्रकरणात शासनाचा 21 कोटी रुपयांचा महसूल बुडविला असल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर विभागाने त्यांच्या बावधन येथील तीन वर्षांहून अधिक कार्यकाळातील सर्वच दस्तांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश मुठे यांनी सह जिल्हा निबंधकांना दिले आहेत. त्यामुळे तारू यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पद्धतीने जी दस्तनोंदणी झाली आहे, अशा प्रकरणातील सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी बुधवारी गैरहजर राहिल्या. त्यामुळे त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स समितीकडून बजाविण्यात आले आहे.