

प्रभाग क्रमांक : 3 विमाननगर-लोहगाव-वाघोली
विविध उपक्रमांतून मतदारांना अप्रत्यक्षपणे आमिष समाविष्ट गावांमुळे विमानननगर -लोहगाव-वाघोली असा नव्याने प्रभाग झाला आहे. या प्रभागात पुन्हा कमळ फुलविण्यासाठी भाजप आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांना पक्षात प्रवेश देणार असल्याची चर्चा आहे. प्रभागरचना आणि संभाव्य आरक्षणामुळे दोन माजी नगरसेवकांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी, अशी तिरंगी लढत रंगणार असून, गावकी-भावकीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
या प्रभागाची लोकसंख्या 92 हजार 410 इतकी आहे. यात विमाननगर, सोमनाथनगरचा तीस टक्के, लोहगाव चाळीस टक्के आणि वाघोलीचा तीस टक्के भाग आहे. या प्रभागातून ‘अ’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ‘ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‘क’ गट सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी, असे आरक्षण पडले आहे.
महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या भागातून भाजपचे सर्वच्या सर्व चार नगरसेवक विजयी झाले होते. त्यात बापूराव कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, श्वेता गलांडे-खोसे आणि मुक्ता जगताप यांचा समावेश होता. नव्याने झालेल्या प्रभागामध्ये गांधीनगर वगळल्याने कर्णे गुरुजींना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी नगरसेवक भंडारे यांनी गेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. पण, नव्या प्रभागरचनेमुळे हे आरक्षण रद्द झाले आहे. वडगाव शेरीतील नेत्यांनी आरक्षण पडू नये, यासाठी प्रभागाची हद्दरचना बदलल्याची चर्चा सुरू आहे. तरीही, भंडारे मी निवडणूक लढविणारच, असे जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे भंडारे यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे.
सुरेंद्र पठारे भाजपमध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे काही पदाधिकारी इच्छुकांना वारंवार पठारे यांना भेटण्यासाठी दबाव टाकत आहेत, तर पठारे यांचा पक्षप्रवेश घेऊ नये, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांची भेट घेतली. पण, ‘वरिष्ठांकडून पक्ष वाढतो, तर तुम्हाला काय अडचण आहे?’ असे सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पठारे यांना सार्वजनिक विरोध करणारे गुपचूप त्यांच्यासोबत मीटिंग घेत असून, ‘भाजपमध्ये आल्यावर मला पॅनेलमध्ये घ्या,’ अशी गळ त्यांना घालत आहेत. तसेच, पठारे यांच्याविरोधात सोशल मीडियावर काहींनी छुपे युद्ध सुरू केले आहे. पठारे यांच्या प्रवेशानंतर मुळीक आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलली जाण्याचीही चर्चा सुरू आहे. पण, अजूनही पठारे हे मी भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगत आहेत. पठारे यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे ह्यासुद्धा प्रभागात विविध कार्यक्रम घेत असून, जनसंपर्कावर भर देत आहेत. यामुळे या दोघांपैकी नक्की कोण निवडणूक लढविणार? याबाबत नागरिकांत संभम आहे. मात्र, पक्षांतर झाल्यास भाजपमधील अंतर्गत गटबाजी वाढून त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. या प्रभागात सोपाननगरच्या भागाचा समावेश आहे. त्यामुळे माजी नगरसेविका श्वेता गलांडे यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता आहे. अन्य इच्छुकांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, लोहगावचे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे, अनिल सातव, विजय जाचक, तनुजा शिंदे, प्रिया खांदवे, ॲड. आदित्य खांदवे हे इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडेही इच्छुकांची संख्या मोठी आहे. हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोक खांदवे, माजी उपसभापती बंडू खांदवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन गरुड, मिलिंद खांदवे, माजी नगरसेविका उषा कळमकर, उज्ज्वला खांदवे यांचा समावेश आहे. या प्रभागावर लोहगाव आणि वाघोलीचे वर्चस्व आहे. त्यामुळे या दोन्ही गावांमधील उमेदवार वरचढ ठरण्याची शक्यता आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग््रेास यांच्यात महायुती होण्याबाबत साशंकता आहे. मात्र, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल, असा सूर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या प्रभागात जागावाटप आणि उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरेंद्र पठारे यांच्यासह राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे, दीपक खांदवे, सागर खांदवे, नीलेश पवार, संतोष राखपसरे, अनिल गलांडे, राजेंद्र सातव, जयश्री सातव, मीनाकाकी सातव, संध्या खांदवे, मयूरी खांदवे हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) शंकर संघम, हेमंत बत्ते, मंदाकिनी खुळे, प्रदीप ढोकले, पद्मा शेळके, सारिका पवार, गायत्री पवार आणि रेखा पवार यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून (ठाकरे गट) नितीन भुजबळ तर काँग्रेसकडून भिवसेन रोकडे, भुजंग लव्हे, शम्स मिठानी, करीम शेख, संकेत गलांडे यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे.
आमदारपुत्रांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेमुळे तुतारीतील इच्छुक हे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यातच लोहगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या राड्यामुळे हा प्रभाग आत्तापासूनच संवेदनशील बनला आहे. इथे ‘खराडी गाव विरुद्ध लोहगाव’ अशी लढत रंगणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पठारे यांनी प्रभागातून निवडणूक लढविल्यास येथील स्थानिक इच्छुकांवर अन्याय होईल, अशीही चर्चा आहे.