Devendra Fadnavis Pudhari
पुणे

Devendra Fadnavis: ‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस

ध्वनिप्रदूषणाबाबत सरकारची दिशा स्पष्ट; पुणेकरांना साऊंड सिस्टिमच्या दणदणाटाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सण आणि उत्सवांमध्ये सुरू झालेल्या ‘डीजे’सारख्या काही चुकीच्या पद्धती एकदम बंद करता येत नाहीत. मात्र, लोकसहभागातून त्याचे स्तोम कमी करावे लागणार आहे आणि त्यातूनच यावर योग्य तोडगा काढला जाईल. तोपर्यंत पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करावा," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना केले.

सर्व सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे होतील, यादृष्टीने पावले उचलण्याबाबत आमची दिशा स्पष्ट आहे. मात्र, त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. नागरिकांना साऊंड सिस्टिममधून भूकंप आल्यासारख्या आवाजाचा त्रास होतो. पुणेकरांना हा त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

मुंढव्यातील बजाज फिनसर्व्ह कॅम्पसच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्सवातील दणदणाटावर भाष्य केले. गणेशोत्सव मिरवणुकीत साउंडच्या थप्पी बंद करणारे सोलापूर हे राज्यातील पहिले शहर बनले आहे. नागपुरातही अशा साउंड सिस्टिमवर बंदी आणण्यात येत आहे. त्या पार्श्वभीमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणताही उत्सव अथवा सण पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे. मात्र, उत्सव साजरा करताना त्यात काही वर्षांनी अनेक पद्धतींचा शिरकाव होतो. या प्रथा लगेच बंद पडत नाहीत. कधी कधी कायद्याचा वापरही करावा लागतो. मात्र, लोकांना विश्वासात घेऊन या गोष्टी साध्य करण्यात येतील.

लोकांना साऊंमधून येणाऱ्या भूकंपासारख्या आवाजाचा त्रास होत आहे. असा त्रास होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. याबाबत बऱ्याच जणांचे एकमत आहे. सोलापूरप्रमाणे राज्यासाठी एकच धोरण लगेच अमलात आणता येणार नाही. चर्चेतून ९० ते ९५ टक्के प्रश्न सुटतात. यासाठी आपण काही वेळ द्यायला हवा. मात्र, सण-उत्सव ध्वनिप्रदूषणापासून दूर असतील, ही सरकारची दिशा पक्की आहे. लोकसहभागातून साउंड सिस्टिमचे स्तोम कमी केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बापटांकडे ट्युशन लावावी लागेल...

ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘सर्वसमावेशक’ हा शब्द लवकर सुचत नव्हता. या वेळी ते, ‘मला (विद्यानंद) बापट यांच्याकडे ट्युशन लावावी लागेल,’ असे म्हणाले. तत्पूर्वी, त्यांनी बापट यांना झालेली मारहाण योग्य नसल्याचे सांगितले. मात्र, बापट यांचे मराठी सध्या ट्रेंडिंगवर असल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. त्यांच्या बोलण्यात शुद्ध मराठीचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. मात्र, ज्या पद्धतीने बोलतात, त्याच पद्धतीने इतरांना फार त्रास होणार नाही अशी मांडणी त्यांनी करावी, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT