Social Media Pudhari
पुणे

WhatsApp Video Religious Sentiment Notice: दौंडमध्ये व्हॉट्सअॅपवरील व्हिडिओवरून कारवाई

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; प्रशासनाकडून ५० हजारांच्या कॅश श्युरिटी बॉन्डसाठी नोटीस

पुढारी वृत्तसेवा

दौंड: व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाल्याने दौंड येथील एका जणास बुधवारी (दि. ४) प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

दौंड येथील गांधी चौक परिसरातील जब्बार बाबुलाल शेख (वय ६२) यांच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा कायदा २०२३ अंतर्गत कलम १२७ प्रमाणे प्रस्ताव सादर केला आहे.

या प्रस्तावानुसार, शेख याने 'अकबर भाई सय्यद' या व्हॉट्सअॅप ग्रुपवर परदेशातील एका आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये भगव्या रंगाच्या झेंड्याचा अवमान होत असल्याचे दिसत असून त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊन दोन समाजांत तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पोलीस अहवालानुसार, अशा प्रकारची कृती सुरू राहिल्यास सामाजिक शांतता भंग होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध चॅप्टर प्रोसीडिंग सुरू करून त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा कॅश श्युरिटी बॉन्ड तसेच त्याच रकमेचा नगरसेवक किंवा सरकारी नोकर यापैकी एका व्यक्तीचा जामीनदार घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

यासंदर्भात विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक बारामती, पुणे ग्रामीण यांनी नोटीस बजावून शेख यास कारणे दाखवा नोटीस दिली आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ५० हजारांचा कॅश श्युरिटी बॉन्ड व तितक्याच रकमेचा जामीनदार का घेण्यात येऊ नये, याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच जामीनदार हजर करण्यासाठी एक तासाची मुदत देण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT