Roti Ghat Palkhi Preparation Pudhari
पुणे

Roti Ghat Palkhi Preparation: दौंडमधील रोटी घाट संत तुकाराम महाराज पालखीसाठी सज्ज; फुलांनी सजलेला घाट आकर्षण ठरतोय

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक नियोजन पूर्ण; रोटी घाट भक्ती परंपरेचा साक्षीदार

पुढारी वृत्तसेवा

खोर: जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी दौंड तालुक्यातील रोटी घाट सज्ज झाला असून, संपूर्ण घाट परिसर रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीने खुलून दिसत आहे. पालखीमार्गावरील स्वच्छता, सुशोभीकरण आणि स्वागताची जय्यत तयारी पूर्ण झाल्याने तुकोबांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १२ जुलै रोजी दौंड तालुक्यात दाखल होणार आहे. १३ जुलै रोजी वरवंड येथे मुक्काम झाल्यानंतर पालखी पाटसमार्गे रोटी घाटातून गवळ्याची उंडवडीकडे प्रस्थान करणार आहे. या दिवशी सुमारे ३९ किलोमीटरचा टप्पा पार करून पालखी गवळ्याची उंडवडी येथे मुक्कामी पोहोचणार असल्याने रोटी घाटाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी रोटी घाटाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या रंगीबेरंगी फुलांमुळे संपूर्ण मार्ग आकर्षक बनला आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या वारकरी, भाविक आणि वाहनचालकांना हा निसर्गरम्य देखावा विशेष आनंद देत आहे.

पालखी मार्गावर स्वागत कमानी, दिशादर्शक फलक, स्वच्छता मोहीम, वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्य व आपत्कालीन सेवांची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकही वारकऱ्यांच्या सेवेसाठी उत्साहाने पुढे सरसावले आहेत.

रोटी घाट भक्ती परंपरेचा साक्षीदार

रोटी घाट हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, वारकरी परंपरेतील श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा साक्षीदार आहे. दरवर्षी लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकोबा”चा जयघोष करत या घाटातून मार्गक्रमण करतात. यंदा रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या रोटी घाटामुळे पालखी सोहळ्याचे स्वागत अधिक दिमाखदार आणि अविस्मरणीय ठरणार आहे. रोटी घाट सज्ज झाला असून, आता प्रतीक्षा आहे ती तुकोबांच्या आगमनाची, असे पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी केकाण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT