Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: यवत हादरले! पिस्तुलाचा धाक दाखवून 23 वर्षीय तरुणीचे अपहरण

दौंड तालुक्यातील धक्कादायक प्रकार; यवत पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली

पुढारी वृत्तसेवा

यवत: दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे एका 23 वर्षीय तरुणीचे पिस्तुलाचा धाक दाखवून घरातून जबरदस्तीने अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 जुलै 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बोरीभडक येथील फिर्यादी विद्याधर नारायण पवार (वय 60) यांच्या राहत्या घरी घडली. आरोपी कमरुद्दीन मुकीम शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) हा त्याच्या दोन अनोळखी साथीदारांसह फिर्यादीच्या घरी आला. त्यानंतर फिर्यादीची मुलगी अक्षदा पवार (वय 23) हिला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणून चारचाकी वाहनात बसवून पळवून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

यावेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या वडिलांना ढकलून मारहाण केली, तर पत्नीला लाथ मारून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याच गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी घरातील रु. 5 लाख 1 हजार 500 रोख रक्कम आणि सुमारे 7 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टच्या व विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून तरुणीचा शोध आणि आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT