Balbharati Class 2 Marathi Book Pudhari
पुणे

Balbharati Class 2 Marathi Book: घोका-ओका पद्धतीला फाटा? इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकात कृतीशिक्षणावर भर

कथा, कविता आणि कृतीशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजवण्याचा बालभारतीचा प्रयत्न; नवे पुस्तक यंदा उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

गणेश खळदकर

पुणे: केवळ घोका आणि ओका ही शिक्षणपद्धती आता मागे पडणार असून, पाऊस, साबणाचे बुडबुडे, भाज्यांची शाळा, कबुतर आणि मुंगीची गोष्ट, आदितीचे साहस, दिवाळी, बैलजोडी आदी धड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक मूल्ये, नैतिकता मदतीची, संस्कृतीची बिजे रोवत कृतीशिक्षणाच्या माध्यमातून सजग नागरिक घडविण्याचा प्रयत्न इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती या पुस्तकातून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना यंदा देण्यात येणार आहे. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीची नवी पुस्तके प्रकाशित केल्यानंतर, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानुसार इयत्ता दुसरीची मराठी, गणित, इंग्रजी या विषयांची पुस्तके यंदा विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीच्या मराठी पुस्तकाचे चार भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक भागांत सहा अशा एकूण २४ प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कथा, कविता, चित्रकथांचा समावेश करण्यात आला आहे. मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार केला, तर विद्यार्थ्यांना कथा समजणे काहीसे अवघड जाणार आहे. परंतु आभाळाचा फळा, पाऊस, भाज्यांची शाळा, मासा, शाळा, सिरींज, सिसरींज रे, आदी कवितांनी वर्गात रंगत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर, कथांमध्ये मारीयाचे स्वप्न, चांदोबाचा अंगरखा, कोल्हा आणि करकोचा, हत्तीचे गर्वहरण, लपाछपी, लिहावे नेटके आदी धड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला विकसित करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. पानांची उत्तम रंगसंगती आणि चित्रकथांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले हे मायमराठीचे पुस्तक विद्यार्थ्यांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांना हे पेलणार का?

इयत्ता दुसरी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शब्दओळख करण्याचा काळ आणि अशा वेळी थेट विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेलाच आव्हान निर्माण करणारे लेखन त्यांच्या पचनी पडणार का, कृतिप्रवण होण्यासाठी अगोदर विचाराधीन होणे गरजेचे असते. त्यामुळे हे लेखन विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असल्याचे मत पुस्तकाचे विश्लेषण करण्यासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना सजग करणाऱ्या हेल्पलाईन

दुसरीच्या विद्यार्थ्यांना सजग करण्यासाठी टेलिमानस, मनोदर्पण, पॉक्सो आणि चाईल्डलाईन हेल्पलाईन देण्यात आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत टेली मानस ही हेल्पलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून मानसिक आरोग्याशी संदर्भात समस्यांचे तज्ज्ञांकडून निवारण केले जाते. विद्या प्राधिकरणाच्या मनोदर्पण या कक्षाव्दारे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन व साहाय्य प्रदान केले जाते. पॉक्सो या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तसेच विशेष करून विद्यार्थिनींना कोणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल, तर त्यांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रार करण्यास सांगितले आहे. तर, १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी पीडित असतील गोंधळात किंवा तणावात असतील, तर या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाणार आहे. या चारही हेल्पलाईन दुसरीच्या मराठीच्या पुस्तकाच्या कव्हर पानांच्या आतील बाजूस छापण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT