पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील अत्यंत वेगवान वाहतूक असलेल्या रस्त्यावर जीव धोक्यात घालून धोकादायरीत्या रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या पुलाची उभारणी वेगात सुरू असून, पुढील महिना अखेरपर्यंत तो पूर्ण होणार आहे. या पुलामुळे मुळशी रस्ता ते बावधनच्या इराणी कॅफेपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचणे, पादचाऱ्यांना सहज शक्य होणार आहे.
चांदणी चौक परिसरातून रस्ता ओलांडणे, ये-जा करणे, हे पादचाऱ्यांसाठी मोठे आव्हान होते. परिणामी, अपघाताचा धोका मोठा होता. हीच अडचण ओळखून एनएचएआय प्रशासनाने या ठिकाणी पादचारी पूल उभारणीला मंजुरी दिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता ते काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. या पुलाच्या उभारणीसाठी (सिमेंट काँक्रीट) आणि लोखंडी स्तंभांचा (कॉलम) यांचा वापर करण्यात आला आहे. सध्या मुंबईच्या दिशेला जिथे वाहनांची मोठी वर्दळ असते, तिथे पुलाचे मुख्य कॉलम उभे करण्यात आले आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा पूल अत्यंत मजबूत आणि आधुनिक असेल, याची खबरदारी घेतली जात आहे.
एकूण खर्च : सुमारे 12 ते 15 कोटी रुपये.
कामाची प्रगती : 65 ते 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुदत : फेबुवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
कार्यकारी यंत्रणा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
काम करणारी कंपनी : इन्फा एमडी
बावधन आणि चांदणी चौक परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांना या पुलाचा सर्वाधिक फायदा होईल. रस्ता ओलांडण्यासाठी आता धावत्या गाड्यांमधून रस्ता शोधण्याची गरज उरणार नाही. अंदाजे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मजूर आणि अभियंते झटत आहेत. पुढील महिन्यात हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर या परिसरातील पादचाऱ्यांचा मोठा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
चांदणी चौक ते बावधनदरम्यान लोखंडी पादचारी पूल उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यामुळे येथून धोकादायरीत्या रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.