पुणे: ‘खडकीत फक्त चांदणे गँगच राज्य करणार,’ अशी दहशत निर्माण करत मैत्रिणीवरून झालेल्या वादात एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या चांदणे गँगच्या म्होरक्याला गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पथकाने वानवडी परिसरातून थरारक पाठलाग करून अटक केली. आकाश दत्ता चांदणे (वय २८, रा. महादेववाडी, खडकी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
खडकीतील पत्रा चाळ परिसरात २९ जून रोजी मैत्रिणीवरून झालेल्या वादात राहुल राम पिवाळ याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भांडण मिटविण्यास गेलेल्या राहुलवर चांदणे गँगच्या सदस्यांनी निर्घृण हल्ला चढविला. या घटनेनंतर खडकी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली होती.
मात्र, गँगचा म्होरक्या आकाश चांदणे आणि त्याचे तीन साथीदार फरार होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट-४चे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शशांक डोंगरे यांना आकाश चांदणे हा मागील दोन दिवसांपासून वानवडी परिसरात लपून राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. तसेच तो हेवन रोडवरील परांडे लॉन्ससमोर एका व्यक्तीला भेटण्यासाठी येणार असल्याचेही समजले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.
आकाश घटनास्थळी येताच त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांच्यासह पथकाने सार्वजनिक रस्त्यावर थरारक पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले. चौकशीत त्याने कायमस्वरूपी पुणे शहर सोडून पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. तसेच खडकीतील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सहभागाची कबुलीही दिली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त तेजस्वी
सातपुते, पोलिस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस निरीक्षक वैभव मगदूम, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलिस हवालदार जहांगीर पठाण तसेच पोलिस अंमलदार शशांक डोंगरे, वैभव रणपिसे आणि विशाल इथापे यांच्या पथकाने पार पाडली.