Traffic Pudhari
पुणे

Chakan Talegaon Industrial Area Traffic Congestion: चाकण-तळेगावच्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा दणका; ३१ ऑगस्टची डेडलाइन

रस्तेदुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, अनधिकृत पार्किंग आणि महामार्ग दुरुस्तीची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्तेदुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, पार्किंगव्यवस्था आणि राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती ही कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूकव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या भागात मोठ्या संख्येने उद्योग आणि कंपन्या असल्याने दररोज हजारो कामगारांची वाहतूक तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

कंपन्यांनी त्यांच्या आवारात पुरेशी पार्किंगव्यवस्था उपलब्ध करून द्यावी; जेणेकरून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करण्याचे प्रमाण कमी होईल, अशी सूचना करण्यात आली. सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने त्यावरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील तसेच सार्वजनिक रस्ते, नाले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने हटवावीत. चाकण आणि तळेगाव परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आल्या.

दरम्यान, चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नगररचना विभागामार्फत परिसराचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. भविष्यातील वाहतूक आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन आवश्यक नियोजनात्मक उपाययोजना करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे.

समन्वयाने काम करून दिलेली मुदत पाळा

या बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभिजित चौधरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसीच्या बांधकाम विभागातील अभियंते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी परस्परसमन्वयाने काम करून ३१ ऑगस्टची अंतिम मुदत पाळावी, असे निर्देश कुशवाह आणि डुडी यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT