

पुणे: कमी दाबाने होणारा सीएनजीचा पुरवठा, सिलिंडरद्वारे पुरवठा होणाऱ्या पंपांवर वारंवार संपणारे इंधन, ५,६००हून अधिक वाहनांमागे असलेला एक सीएनजी पंप यामुळे एका वाहनाला इंधन भरण्यासाठी किमान तीन ते पाच तास लागत आहेत. शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सीएनजी पंपचालकांनी थेट दिल्लीत धाव घेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (पीडीएपी) ने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाला पुण्यातील झपाट्याने बिघडत चाललेल्या सीएनजी पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. पीडीएपीचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल, उपाध्यक्ष धनंजय शितोळे, कार्यकारिणी सदस्य केयूर शाह आणि अजिंक्य टेकवडे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संयुक्त सचिव आलोक त्रिपाठी आणि संचालक विकास सिंह यांची भेट घेऊन पुण्यातील स्थितीबाबत सादरीकरण केले. यावेळी गेल, एमएनजीएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पीडीएपीने मंत्रालयाला सांगितले की, पुण्यात सुमारे साडेसात लाख वाहने सीएनजीवर आहेत. या वाहनांसाठी अवघे १३३ सीएनजी पंप आहेत. या पंपांवर सीएनजीचा दाब पुरेसा नसतो. याशिवाय डॉटर बूस्टर स्टेशन (डीबीएस) अर्थात मोठ्या सिलिंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरणारे पंप आहेत. या पंपावरील गॅस वारंवार संपण्याचे प्रकार घडतात. या स्थितीमुळे सीएनजी पंपांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागतात. एका वाहनाला किमान तीन तास प्रतीक्षा करावी लागते. गर्दीच्या काळात ही प्रतीक्षा तब्बल पाच तासांवर जाते.
त्यामुळे वाहनचालकांचा कामाचे तास वाया जात असून, आर्थिक नुकसानही होत आहे. पंपाबाहेरील रांगांमुळे वाहतूककोडीत भर पडत आहे. त्यामुळे सीएनजी पंपांची संख्या दुप्पट करण्याची मागणी संघटनेने केली आहे. असोसिएशनने याकडेही लक्ष वेधले की, गॅसचा दाब, पाइपलाइन क्षमता, कॉम्प्रेसरवरील भार, गॅसवाटप किंवा नवीन पायाभूत सुविधांचा विस्तार यावर डीलर्सचे कोणताही नियंत्रण नाही. तरीदेखील सीएनजी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे निर्माण होणारा नागरिकांचा रोष, वाहतूक कोंडी, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि प्रशासकीय कारवाईला डीलर्सनाच सामोरे जावे लागत आहे.
अशी आहे शहरातील स्थिती...
पुण्याला सीएनजीचा पुरवठा प्रामुख्याने पाइपलाइनद्वारे (ऑनलाइन पुरवठा प्रणाली) द्वारे होतो. ऑनलाइन पंपांची संख्या ९४ आहे. तर, डॉटर बूस्टर स्टेशन्सद्वारे म्हणजे सिलिंडरद्वारे गॅस भरण्याची सुविधा ३९ पंपांवर आहे. मात्र, पुण्याची रोजच्या सीएनजी मागणीचा अधिकृत आकडा एमएनजीएलकडे उपलब्ध आहे. त्याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
कमी दाबाने पुरवठा झाल्यास सीएनजी बसतो कमी
सीएनजी गॅसचा पुरवठा कमी दाबाने असल्यास १२ किलोची टाकी असेल तर केवळ आठ ते नऊ किलो गॅस बसतो. परिणामी संबंधित वाहनचालक लवकर इंधन भरण्यासाठी पंपावर येतो. त्यामुळे पुरेसा दाब देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.