Chakan Nagar Parishad Election Pudhari
पुणे

Chakan Nagar Parishad Election: चाकणमध्ये राजकीय सस्पेन्स वाढला! 74.28% विक्रमी मतदान कोणाला तारक, कोणाला मारक?

दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र; राष्ट्रवादीकडून तगडे आव्हान, निकालासाठी 21 डिसेंबरची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण : चाकण नगरपरिषद निवडणुकीत 74.28 टक्के मतदान झाले आहे. मतदान यंत्रे बंद पडण्याचे किरकोळ एक-दोन प्रकार वगळता मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात मतदानाची गती पाहता 75 टक्के मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मतदानाचा हा वाढलेला टक्का नेमका कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

चाकण पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या 4 उमेदवारांचे आणि 22 नगरसेवकपदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने रद्द करून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे चाकणमधील राजकीय सस्पेन्स पुन्हा ताणला गेला आहे.

चाकण नगरपरिषदेच्या 12 प्रभागांतील उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या 4 उमेदवारांसाठी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. सकाळपासूनच मतदानाचा वेग चांगला होता. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 57.64 टक्के मतदान झाले होते. रात्री उशिरा पालिका प्रशासनाने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार एकूण मतदान 74.28 टक्के मतदान झाले. यामध्ये 12 हजार 729 पुरुष आणि 11 हजार 876 महिला अशा एकूण 24 हजार 605 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण अंतिम टक्केवारी 74.28 एवढी नोंदवली गेली.

चाकण पालिका निवडणुकीत खरी लढत ही महायुतीमध्येच होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि भाजप यांच्यातच खरी लढत होत आहे. शिवसेना (उबाठा) आणि कॉंग्रेस यांनी मोजक्या जागांवर उमेदवार दिले आहेत.

कुठल्या पक्षाचे किती उमेदवार

चाकण नगरपरिषदेचे 12 प्रभाग आहेत. त्यातून 25 नगरसेवक निवडून दिले जात आहेत. त्यातील शिवसेनेचे नितीन गुलाबराव गोरे व राष्ट्रवादीचे वर्षा सुयोग शेवकरी आणि प्रकाश राजाराम भुजबळ हे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे नगरसेवकपदासाठी 22 उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी शिवसेनेकडून दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे, काँग्रेसकडून संगीता आनंद गायकवाड, राष्ट्रवादीकडून भाग्यश्री विवेक वाडेकर, भाजपाकडून हर्षला घनश्याम चौधरी यांच्यात चौरंगी लढत झाली. शिवसेनेने शिवसेना (उबाठा) पक्षासाठी 5 जागा सोडल्या होत्या. त्यातील 1 जागेवर दोन्ही सेनेत केवळ मैत्रिपूर्ण म्हणून जोरदार लढत झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 2 प्रभागांतील 3 जागा वगळता उर्वरित प्रभागांत 22 उमेदवार दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहरात कुठेही उमेदवार दिले नव्हते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला तगडे आव्हान

चाकण शहर म्हणजे दिवंगत आमदार सुरेश गोरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे चाकणमध्ये ग्रामपंचायत असल्यापासून येथे गोरे गटाचे वर्चस्व राहिले आहे. दिवंगत आमदार गोरे यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृवाखाली जोरदार तयारी केली होती. चाकणचे माजी उपसरपंच व भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांची सून भाग्यश्री वाडेकर यांना नगराध्यक्षापदाची उमेदवार म्हणून उभे केले. त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीत चुरस निर्माण झाली.

काँग्रेसकडून काही ठिकाणी उमेदवार

काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 3 प्रभागांत उमेदवार उभे करून अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मागील कार्यकारी मंडळात कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता. पारंपरिक मतदारांवर विसंबून काँग्रेसकडून जोरदार प्रचारमोहीम राबवण्यात आली.

भारतीय जनता पक्षाकडून शक्तिप्रदर्शन

भारतीय जनता पक्षाने मागील काळात शहरात राबवलेल्या संघटनकौशल्यावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी अनेक प्रभागांत स्वतःचे उमेदवार उभे केले. चाकण पालिकेच्या मागील कार्यकारी मंडळात भाजपचा केवळ एक नगरसेवक होता. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदाच्या 1 उमेदवारासह 12 जागा लढवल्या आहेत. त्यातील किती जागांवर यश मिळणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

चाकण येथे दोन्ही शिवसेना एकत्र

शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकण नगराध्यक्ष निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार बाबाजी काळे आणि शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे हे दोघेही एकत्र उपस्थित होते. आपले मार्गदर्शक असलेले दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून त्यांच्या पत्नीला आम्ही त्यांना पाठिंबा दिला. चाकण नगराध्यक्षपदापुरता मर्यादित पाठिंबा असल्याचेदेखील आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT