

जावेद मुलाणी
इंदापूर : नगरपरिषदेसाठी अतिशय चुरशीने मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबल्याने मोठा राजकीय ‘सस्पेन्स’ निर्माण झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या राज्य पातळीवरील नेत्यांसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आणि प्रदीप गारटकर तसेच जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने यांची प्रतिष्ठा आणि आगामी राजकीय हालचाली या निवडणुकीत पणाला लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना डावलून माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना पक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर इंदापूरच्या या निवडणुकीत मोठ्या राजकीय हालचाली झाल्या आणि गारटकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपाचे माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने या नेत्यांसह दोन्हीही शिवसेना गट, रासप, मनसे इतर सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतः नगराध्यक्षपदाला उभे राहत सर्व पॅनल उभा करत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आव्हान दिल्याने या लढतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नगरपरिषदेची निवडणूक असली तरी यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध तालुक्यातील सर्व नेते एकत्र असाच संघर्ष स्पष्ट दिसत असून, नगरपरिषदेच्या निकालावर पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह विधानसभेची राजकीय गणिते हा निकाल ठरविणार असल्याचेच म्हणावे लागणार आहे.
दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवार यांना भरत शहा यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी अशी अटकळ घातल्याने प्रदीप गारटकर यांनी आपल्या आजवरच्या संघटनात्मक कौशल्याने भरणे आणि शहा यांच्या विरोधातील मोट एकवटण्याचा प्रयत्न केला, त्याला यश आले ‘मिशन भरणे’ या ध्येयाने तालुक्यातील सर्वच बडे नेते एकवटून संपूर्ण ताकद त्यांनी नगरपरिषदेच्या मैदानात लावली.
भरणे यांनी स्वतः तब्बल आठ सभा घेतल्याच, शिवाय भरणे कुटुंबातील सर्वजण विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे रणांगणात उतरल्याचे दिसले. सर्वांनीच प्रचारात शहर पिंजून काढले. अजित पवारांनी सांगता सभा घेत एकमेकांची तोंड ही न पाहणारी नको ती माणसं एकत्र आली आहेत, कुणाच्या बा ला जमलं नाही, ते भरत शहा यांनी करून दाखवलं, असे म्हणत आपल्या विरोधात एकवटलेल्या नेत्यांबद्दल वक्तव्य केले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यासोबत रिपाई आठवले, कवाडे, सोनवणे गट विरुद्ध भाजपा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना दोन्ही गट, रासप, मनसे यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विरोधात थेट निवडणूक लढवली असली तरी वंचित बहुजन आघाडी, इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी देखील स्वतंत्रपणे या निवडणुकीत नगराध्यक्ष व काही नगरसेवकपदाच्या जागा लढविल्या.
मंगळवारी 2 डिसेंबर रोजी 79.89 टक्के मतदान झाले. यामध्ये 12188 पुरुष ,12634 महिला इतर 7 असे एकूण 24829 मतदान असून, यापैकी 9750 पुरुष, तर 10084 महिला इतर 3 असे एकूण 19,837 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
पक्ष प्रवेश आणि आघाडी या राजकीय उलथापालथीमध्ये निवडणुकीपूर्वी नगराध्यक्षपदासाठी चर्चेत असणारे वसंतराव माळुंजकर, अशोक इजगुडे, अनिल राऊत, ॲड. इनायत काझी, इबाहिम शेख, अमर गाडे, शेखर पाटील, पोपट शिंदे, डॉ. लहू कदम, डॉक्टर अश्विनी ठोंबरे यांना थेट नगरसेवकपदापासून देखील दूर राहावे लागले. यातील केवळ चर्चेत असलेल्या अरविंद वाघ, बाळासाहेब ढवळे, कृष्णा ताटे यांना नगरसेवकपदावर यावे लागल्याने याची देखील चांगली चर्चा रंगत आहे.