

मंचर : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्यांची दहशत पुन्हा वाढत असून, सतत दिसणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मंगळवारी (दि. 2) रात्री अवसरी-कामठेमळा रोडवर गणपती कारखान्याजवळ 3 बिबट्यांचा रस्ता ओलांडतानाचा थरारक क्षण एका तरुणाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सध्या परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
बुधवारी (दि. 3) पहाटे हासवडमळा भागात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या अडकला. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वारंवार बिबटे दिसत असल्याने ग्रामस्थांनी पिंजरे वाढविण्याची मागणी केली होती. स्थानिक शेतकरी राजू गावडे, शरद गावडे व संदीप गावडे यांच्या विनंतीनंतर पिंजरा लावण्यात आला आणि अखेर बिबट्या जेरबंद झाला.
गणपती कारखाना परिसरातील आधीचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने ग््राामस्थांनी बिबट्यांच्या हालचाली वाढलेल्या नव्या ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी केली. विद्यार्थी आणि ग्रामस्थांची रात्रीची ये-जा धोकादायक बनल्याने सरपंच वैभव वायळ यांनीही तातडीने पिंजरे बसविण्याची मागणी केली आहे.
पिंजरा लावण्याच्या आणि देखरेखीच्या कामात गुलाब इनामदार, नवाब इनामदार, बाळासाहेब गावडे, अनिल गावडे आणि रज्जाक पठाण यांनी सहकार्य केले. पकडलेला बिबट्या मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले आणि वन कर्मचाऱ्यांकडून सुरक्षितरीत्या अवसरी उद्यानात हलविण्यात आला आहे. गणपती कारखाना परिसरात आणखी एक पिंजरा दुपारपर्यंत बसविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
टाकळी हाजी :
निमगाव दुडे (ता. शिरूर) परिसरातील कवठे येमाई रोडवर घोडनदीच्या काठावर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार, दि. 2 रोजी रात्री एक नर बिबट्या जेरबंद झाला. अंदाजे 6 ते 7 वर्षे वयाचा असलेल्या या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सुरक्षितरीत्या हलविण्यात आल्याची माहिती वनरक्षक नारायण राठोड यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून निमगाव दुडे, दुडेवाडी, टाकळी हाजी येथील खडकवस्ती व रावडेवाडी परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच घोडनदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्येही बिबट्यांच्या वर्दळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांकडून होत होती.
दरम्यान, परिसरात ऊसतोडीचे काम सुरू असल्याने बिबटे उसातून बाहेर पडत असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी लावलेल्या पिंजऱ्यामुळे संभाव्य धोका टळल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील फाकटे येथे बुधवारी (दि. 3) पहाटे एका विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे बाहेर काढले. अंदाजे तीन वर्ष वयाच्या या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले. यापूर्वी फाकटे येथे दोन बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
फाकटे येथील शेतकरी नवनाथ दत्तू शेलार हे बुधवारी सकाळी पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्यांना विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे दिसले. बिबट्या विहिरीच्या पाण्यामध्ये अडकल्याचे पाहून शेलार यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांना माहिती दिली. पिंगळे यांनीही गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि वनरक्षक लहू केसकर यांना सविस्तर माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार महेंद्र दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेत आणि योग्य नियोजन केले. रेस्क्यू टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्याने मोठ्या कौशल्याने व सुरक्षितपणे बाहेर काढले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथकाच्या जलद प्रतिसादाबद्दल आणि यशस्वी बचाव कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.