

आळंदी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार (दि.2) रोजी उत्साहात मतदानप्रक्रिया पार पडली असून, उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये समाविष्ट झाले आहे. आता रविवारी (दि.21) रोजी त्याचा निकाल समोर येणार आहे. निकाल लांबल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहराची एकूण मतदारसंख्या - 25331 असून यात पुरुष मतदार 13501 व महिला मतदार 11827 व इतर 3 मतदार आहेत. त्यापैकी यंदाच्या निवडणुकीत 19165 जणांनी मतदान केले. यात 10168 पुरुष, 8994 महिला व तीन इतर मतदारांचा समावेश होता. शहरात जवळपास सरासरी 75.66 टक्के मतदान झाले. मतदानाची आकडेवारी वाढलेली असून, वाढलेली आकडेवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याचा खल आता सुरू झाला आहे.
भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यास केलेला उशीर हा यंदाच्या निवडणुकीत विशेष मुद्दा ठरला. भाजपच्या विश्वासावर बसलेल्या अनेक निष्ठावंतांना ऐनवेळी घड्याळ, मशाल व अपक्ष चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळ आली. यामुळे भाजपविरोधात सगळे असे आळंदीतील चित्र होते. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत मात्र एकास एक लढत होऊ देणं ही जमेची बाजू ठरली. यामुळे मतविभाजन न होता थेट दोन पक्षांत कडवी झुंज झाल्याचे दिसून आले. याचा निश्चितच फायदा निकालात होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपने सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले, तर आळंदीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीप्रमाणे आपली संयमी प्रचार यंत्रणा राबविल्याचे दिसून आले.
यामुळेच भाजपचा आक्रमक, तर राष्ट्रवादीचा संयमी प्रचार कोणाला तारणार व कोणाला हरवणार ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांची मोठी संख्या दिसून आली. त्यांना तिकीट डावलले गेल्याने त्यांनी थांबण्याऐवजी थेट भाजपच्या उमेदवाराच्या विरोधातच मैदानात उतरणे पसंत केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. अनेक प्रभागांत अपक्ष विरुद्ध भाजप अशा चुरशीची लढती रंगल्या. भाजपनेदेखील अनेक प्रभागांत शर्थीने खिंड लढविल्याचे दिसून आले. प्रभाग एकमध्ये तर पती- पत्नीनेच हाती धनुष्य घेत स्वतः उभे राहत समोरच्या उमेदवारांना आव्हान उभे केल्याचे दिसून आले. काँग्रेसनेदेखील एका प्रभागात आपला उमेदवार देत आळंदीच्या निवडणुकीत पंजा दिला. त्याने सर्वच पक्षांना उघड लढत दिली. उद्धव ठाकरेंची मशालदेखील रात्रीची हलगीच्या आवाजात ऐन थंडीत प्रभागात तेवत प्रचार करत असल्याची दिसून आली.
एकंदरीत गावकी, भावकीबरोबरच निष्ठा, विकास, गाववाले, बाहेरवाले, जात, धर्म, पंथ आणि शह-काटशहाच्या राजकारणाची झलक यंदाच्या निवडणुकीत पुरेपूर दिसून आली आणि विशेष म्हणजे राजकीय मुत्सद्देगिरीची नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत दिलेली चुणूक विशेष नोंद ठरली.
आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षपद खुल्या गटातील असल्याने नगरपरिषदेवर सत्ता भाजप की राष्ट्रवादीची, याबाबत उत्सुकता आहे. नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असून, चारजणांनी ही निवडणूक लढवली, तर दहा प्रभागांतून निवडल्या जाणाऱ्या 21 सदस्यपदांसाठी 61 उमेदवार निवडणकीच्या रिंगणात होते. यांपैकी प्रभाग आठमध्ये सुजाता तापकीर या बिनविरोध उमेदवार होत्या. अन्य प्रभागांतील निवडणुकांसाठी भाजपचे 21. शिवसेनेचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चार, काँग्रेसचे एक आणि दहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. राष्टवादी काँग्रेसने प्रभाग एक आणि सातमध्ये एकही उमेदवार दिला नाही, तर प्रभाग आठ आणि दोनमध्ये प्रत्येकी एक उमेदवार दिला. यामळे काही ठिकाणी भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तर काही ठिकाणी शिवसेनेबरोबर संघर्ष होता.