पुणे : पुणे पोलिसांकडून शहरात सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी पोलिसांच्या ठेकेदाराकडून शहरभरात सरसकट खोदाई केली जात आहे. याबाबत महापालिकेने कारवाईचे पत्र बजावूनही त्या पत्राला ठेकेदाराने केराची टोपली दाखवत मनमानी कारभार करीत लॉ कॉलेज रस्त्यावर खोदाई सुरू केली असून, थेट पावसाळी लाइनच्या चेंबरमधून थेट केबल टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात असून, महापालिका समजपत्र न देता कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Latest Pune News)
शहरात ‘सीसीटीव्ही’च्या केबल टाकण्यासाठी महापालिकेने पोलिस विभागाला फक्त पेठ परिसरात रस्तेखोदाईची परवनागी दिली असताना सरसकट शहरभर रस्ते खोदले जात आहेत. या खोदाईत अनेक चांगले रस्ते व नुकतेच तयार केलेले रस्तेसुद्धा खोदून ठेवले आहेत. केबल टाकून रस्ते चांगले बुजविणे अपेक्षित असताना केवळ माती टाकून रस्ते बुजविण्याची कारवाई ठेकेदाराने केल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, खडी पसरली आहे. परिणामी, अपघात होत आहेत.
महापालिकेकडे ठेकेदाराबाबत अनेक तक्रारी आल्यावर महापालिकेने थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी भेट घेत त्यांना दिलेली परवानगी व ठेकेदाराने प्रत्यक्षात खोदलेले रस्ते याचे पुरावे दिले. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित ठेकेदाराला सुनावत यापुढील काळात महापालिकेकडून तक्रार येऊ न देण्याची समज दिल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले होते. तसेच, दिवाळीपर्यंत रस्तेखोदाई बंद ठेवावी, अशा सूचना देखील महापालिकेने ठेकेदाराला दिल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या पत्राला व आदेशाला ठेकेदाराने केराची टोपली दाखवत मनमानी पद्धतीने रस्तेखोदाई सुरूच ठेवली आहे. मात्र, त्यानंतरही खोदाई सुरूच आहे.
या ठेकेदारामर्फत संपूर्ण शहरभर रस्तेखोदाई सुरू आहे. रस्ते खोदताना या पदपथाचे पेव्हर तोडून केबल टाकली जात आहे. ‘अर्बन स्ट्रीट’अंतर्गत जंगली महाराज रस्ता ते महापालिका भवन नदीच्या कडेला केलेला पदपथ तोडण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी काँक्रीट रस्ते मधोमध बेकरने फोडून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करणार कोण? हा सवाल उपस्थित झाला आहे.
पुणे पोलिसांचे सीसीटीव्हीचे काम आणि महापालिकेच्या ‘महाप्रीत’ शासकीय संस्थेसोबत करार झाला असून, यासाठी देखील आता आणखी 500 किमीपेक्षा अधिक रस्त्यांची पुन्हा खोदाई करण्यात येणार आहे. याबाबतची परवानगी देताना केवळ महापालिकेने ठेकेदाराचा फायदा बघितला का? असा आरोप सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केला असून, याची चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.
सीसीटीव्हीसाठी पुणे पोलिसांकडून शहरात 1600 किमी लांबीच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही केबल टाकण्यात येणार आहे. यासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी 650 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाला महापालिका पत्र पाठवणार होती. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे अद्याप हे पत्र पाठविलेले नाही. त्यामुळे हा खर्च महापालिका करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.