

बारामती : दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी या हेतूने महावितरणने उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महसूल देयके व देखभाल दुरुस्ती (संवसु) अशी विभागणी करून उपविभाग व शाखा कार्यालयाची फेररचना करून स्वतंत्रपणे यंत्रणा तयार करण्यात आली आहे.(Latest Pune News)
देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक संवर्गातील कर्मचारी विद्युत यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे, नवीन विद्युत यंत्रणा उभारणी कामे, नवीन वीजजोडणी देणे, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण, वीजसेवा सुरळीत ठेवणे ही कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी वीज देयकविषयक कामे, देयकविषयक तक्रारींचे निवारण, वीज देयकांची थकबाकी वसुली ही कामे करतील.
महावितरणमध्ये उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल विषयक कामे, विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाड दुरुस्ती, वीजदेयकांची वसुली, वीजहानी कमी करणे आदी कामे केली जातात.
महावितरण यंत्रणेतील अभियंता व तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन वीजसेवाविषयक विविध कामे करावी लागतात. जुनी रचना साधारणपणे 25 वर्षांपूर्वी तत्कालीन ग्राहकसंख्येच्या आधारे करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि ग्राहकसेवा यावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन वरिष्ठ व्यवस्थापनाने पुनर्रचना करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली. कर्मचारी संघटनांशी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले. आता या पुनर्रचनेच्या आधारे प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे.
बारामती व सातारा या ग्रामीणमधील सर्व शाखा कार्यालयांच्या कामकाजाची महसूल देयके व देखभाल दुरुस्ती अशी विभागणी केली आहे. त्यानुसार स्वतंत्रपणे यंत्रणा तयार करण्यात आली आहे. शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना केली आहे. ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक संवर्गातील कर्मचारी नेमले आहेत. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सोलापूर मंडळातील यापूर्वीच्या सोलापूर शहर विभागांतर्गत समाविष्ट सोलापूर शहर उपविभाग अ, ब, क, ड, ई या पाच उपविभागाची फेररचना करण्यात आली आहे. सोलापूर शहर महसूल व देयके उपविभाग क्र. 1 (पूर्वीचे अ, ब, ड उपविभाग) तर सोलापूर शहर महसूल व देयके उपविभाग क्र. 2 (पूर्वीचे क, ई उपविभाग), सोलापूर शहर संचालन व सुव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 (पूर्वीचे अ, ब उपविभाग), सोलापूर शहर संचालन व सुव्यवस्थापन उपविभाग क्र. 2 (पूर्वीचे क, ड उपविभाग), सोलापूर शहर संचालन व सुव्यवस्थापन उपविभाग क्र. 3 (पूर्वीचे ई उपविभाग) अशी नवीन रचना आहे.