Pune BJP Manifesto Pudhari
पुणे

Pune BJP Manifesto: पुणे महापालिका निवडणूक; भाजपचा संकल्पपत्र जाहीर, मेट्रो व ई-बसवर भर

झोपडपट्टी व स्मार्ट सिटीवर मौन; 40 टक्के मिळकतकर सवलतीबाबत संभ्रम कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा संकल्पपत्र जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. या संकल्पपत्रात पुण्यात मेट्रोचा विस्तार, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण, 1 हजार ई बस खरेदी, नदीसुधार प्रकल्प आदी मुद्द्‌‍यांवर भर देण्यात आला. मात्र, पुण्यातील झोपडपट्टीवासीयांचा व स्मार्ट सिटीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच 40 टक्के मिळकत कराबाबत देखील संभम आहे.

भाजपच्या वतीने पुण्याच्या विकासाचा 34 पानी ‌‘विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र‌’ हा जाहीरनामा पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. या संकल्पपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. कॉंग््रेास व राष्ट्रवादीने जे केले नाही ते पाच वर्षांत भाजपने केल्याचा दावा या संकल्पपत्रात करण्यात आला आहे.

या संकल्पपत्रात पुढील पाच वर्षांत महिलांना सवलतीच्या दरात मेट्रो व पीएमपी सेवा, 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, सर्वसामान्य नागरिकांना 500 चौरस फुटांपेक्षा कमी घर, आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल नागरिकांचा मिळकतकर माफ, खडकवासला- खराडी मेट्रो विमानतळापर्यंत नेणे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळ डेटा सेंटर, माण-म्हाळुंगे टाउनशिप व15 टीपी स्किमची कामे गतीने पूर्ण करणे आदी मुद्द्‌‍यांचा समावेश आहे. मात्र, शहरातील झोपडपट्टीवासीयांसाठी काय करणार, झोपडपट्टी निर्मूलनासाठी नियोजन काय? याचा उल्लेख नाही. पुणे स्मार्ट करण्यात येईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत केले. मात्र, स्मार्ट सिटी कंपनी का बंद केली, याचे उत्तर देणे त्यांनी टाळले.

शनिवारवाड्याजवळ भुयारी मार्गासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी मिळणार का? पुण्यात 54 कि.मी.चे भुयारी मार्ग बांधण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. भाजपच्या जाहीरनाम्यात देखील याचा उल्लेख आहे. मात्र, शनिवारवाड्याच्या परिसरातून भुयारी मेट्रोला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे बोगद्याला परवानगी मिळणार का? याचे उत्तरही मोहोळ यांनी टाळले.

40 टक्के मिळकतकर सवलत मिळणार का?

मनपाकडून 1970 पासून पहिल्या घराला मिळणारी 40 टक्के मिळकतकर सवलत 2019 ते 2021 या काळात बंद केली होती. ती पुन्हा सुरू केली होती. भाजप जाहीरनाम्यात या योजनेचा उल्लेख केला. त्यामुळे ही सवलत कायम राहणार का, हा प्रश्न कायम आहे.

पुणेकर विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून, शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. पुणे शहराला ‌‘वर्ल्ड बुक कॅपिटल‌’ बनविणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, ‌‘एम्स‌’ रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास आदी महत्त्वाकांक्षी संकल्पनांचा समावेश आहे.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT