EX Corporators Ticket Cut Pudhari
पुणे

BJP EX Corporators Ticket Cut: भाजपच्या 35 ते 40 माजी नगरसेवकांचा पत्ता कट? पुणे महापालिका निवडणुकीत मोठा धक्का

नवी प्रभागरचना, आरक्षण व कार्यक्षमतेच्या निकषांमुळे अनेक दिग्गजांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पांडुरंग सांडभोर

पुणे: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आता इच्छुकांची उमेदवारीसाठी धडपडही सुरू झाली आहे. त्यातच महापालिकेतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या तब्बल 35 ते 40 माजी नगरसेवकांचा उमेदवारीतच पत्ता कट होणार असल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने बदलेली प्रभागरचना, त्यामधील आरक्षणे, यामुळे बदललेली गणिते आणि काही माजी नगरसेवकांची अकार्यक्षमता, या कारणांमुळे या सर्वांना घरी बसावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, दि. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊन चित्र स्पष्ट होईल. त्यात सद्यःस्थितीला भाजपकडे इच्छुकांची संख्या प्रचंड असून, तब्बल अडीच हजार इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे उमेदवारीची स्पर्धा प्रचंड चुरशीची असणार आहेत. अशातच 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे जे 98 नगरसेवक निवडून आले होते, त्यातील 35 ते 40 जणांच्या उमेदवारीवर टांगती तलवार उभी आहे..

प्रामुख्याने महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 2017 च्या रचनेत आणि नव्या रचनेत काही प्रभाग एकमेकांत मिसळले गेले आहेत. त्याचा फटका काही माजी नगरसेवकांना बसणार आहे. याशिवाय प्रभागातील आरक्षण सोडतीचा सर्वांत मोठा फटका माजी नगरसेवकांना सहन करावा लागणार आहे. आरक्षण सोडतीत महिला, इतर मागासवर्ग महिला, अनुसूचित जाती-जमाती महिला यांच्या आरक्षणामुळे अनेकांची गणिते बिघडली आहेत.

त्यामुळे अनेक ठिकाणी पुरुष माजी नगरसेवकांना कुटुंबातील महिला सदस्यांना संधी देऊन घरी बसावे लागणार असल्याचे चित्र आहे. याशिवाय भाजपच्या सत्ता कार्यकाळात आणि त्यानंतरच्या प्रशासकीय राजवटीच्या कालावधीतही अनेक माजी नगरसेवक राजकीय विजनवासात गेले होते. आता नागरिकांशी संपर्क नसल्याने कार्यक्षमतेच्या मुद्द्‌‍याच्या आधारे अनेक उमेदवारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळाली.

आगामी काळात अन्य राजकीय पक्षांतील काही मात्तबर उमेदवारांचे प्रवेश भाजपात होणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलणार असल्याने त्याचा फटका भाजपच्या काही माजी नगरसेवकांसह इच्छुकांना बसणार आहे. त्यामुळे जवळपास 40 हून अधिक नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाहीत, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT