हिरा सरवदे
पुणे : महापालिकेचा शिवाजीनगर येथील स्व. आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव सध्या तळीरामांचा अड्डा झाला आहे. येथील जलतरण तलाव आणि जिमच्या परिसरात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि दारू पिण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या ग्लासचा खच पडलेला आहे. जलतरण तलावाच्या परिसरात असे चित्र असताना महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर परिसरातील नागरिकांसाठी स्व. आमदार शिवाजीराव भोसले जलतरण तलाव विकसित करण्यात आला आहे. जलतरण तलावाच्या परिसरात सध्या जीम आहे. जलतरण तलावाच्या संरक्षकभिंतीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला आरोग्य कोठी आहे. जलतरण तलावाच्या समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. शिवाय जलतरण तलावाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची राहण्याची व्यवस्थाही आहे.
असे असताना तलावाच्या परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात दारू बाटल्या आणि दारू पिण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या ग्लासचा खच पडलेला आहे. या बाटल्या आणि ग्लास काही तासांपूर्वी तळीरामांनी दारू पिऊन टाकल्याचे चित्र प्रतिनिधींना दिसून आले. यावरून या ठिकाणी दररोज तळीरामांच्या दारूच्या पार्ट्या झडतात, हे स्पष्ट होते. धक्कादायक म्हणजे जलतरण तलावाच्या पाठीमागील बाजूस काहीजण दिवसाही दारू पित बसलेले आढळून येते.
दुसरीकडे जलतरण तलावाच्या परिसरात काही हातगाड्या, काही वाहने अनेक महिन्यांपासून धूळ खात आहेत. अनेकवेळा येथील पाण्याचा वापर करून बाहेरील चारचाकी गाड्या धुण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी असा सावळा-गोंधळ सुरू असता महापालिका प्रशासन ढुंकूनही पाहत नाही.
Pune Crime : दोन मित्र आपापसात भिडले; एकाने हत्यार चालवले, दुसऱ्याकडून फायरिंग, एकाचा जागीच मृत्यू