भोर: भोर तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील भातशेतीसह अन्य कडधान्ये आणि सोयाबीनच्या उत्पादनाची शाश्वती संपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट उभे राहिले असून, आता शासनाच्या मदतीची आशा लागली आहे. खरिपातून उत्पादन मिळणे तर दूरच; मात्र झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशी स्थिती आहे.
पिकांची आणि पाण्याची स्थिती पाहून 'ट्रिगर वन'मध्ये भोर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत मिळणार कधी? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, कर्जमाफी, सवलती आणि मनरेगाच्या माध्यमातून हाताला काम, या बाबींची पूर्तता झाली, तरच शेतकरी संकटातून सावरणार आहे. अन्यथा, जगावे की मरावे? हा प्रश्न कायम समोर राहणार आहे.
भोर तालुक्यात यंदा जून महिन्यात सुरुवातीला पावसाने उत्तम साथ दिल्याने पेरण्या वेळेत झाल्या. पिकांची उगवण होऊन ती जोमात येऊ लागली असतानाच मागील एक महिन्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन वाढीच्या काळात पावसाची उघडीप आणि वाढत्या उन्हामुळे पिके करपून गेली आहेत.
यंदा तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्यामध्ये प्रामुख्याने भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडीद व मूग या पिकांचा समावेश आहे. पावसाअभावी ७० ते ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. पहिल्याच टप्प्यातील अहवालात पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने तालुक्याचा पहिल्याच यादीत दुष्काळग्रस्त म्हणून समावेश झाला. सध्या शेतकऱ्यांची उभी पिके पावसाअभावी करपून चालली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होणार
भोर तसेच वेल्हा तालुक्यात पावसाअभावी पिके करपून चालली असतानाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. सध्या जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय असली, तरी पुढील चार दिवसांत पाऊस झाला नाही तर पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, असे खानापूर येथील शेतकरी मारूती चव्हाण यांनी सांगितले.