पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक (पी.एच.डी.)अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन आता अधिक उग्र झाले आहे.
महाराष्ट्र राज्य, बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसापासून येथील समाजकल्याण आयुक्त कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. शासनाने लागू केलेला 2023 चा ‘सर्वंकष समान निकष धोरण’ शासन निर्णय पूर्णपणे संविधानविरोधी आहे. यामुळे अनुसूचित जातींचा विशेष घटनात्मक दर्जा धोक्यात येत असल्याचा घणाघात करत विद्यार्थ्यांनी या अन्यायकारक जीआरची जाहीर होळी केली. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे.
पी.एच.डी.करणार्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच सरकारने या जाचक अटी लादल्या असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सामाजिक न्याय विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय टाळाटाळ केली जात आहे. बार्टीच्या माध्यमातून उच्चशिक्षण घेणार्या 58 जातींमधील विद्यार्थ्यांची संख्या केवळ 100 वर आणून सरकारने पीएच.डी. शिक्षणाचे केलेले ’रेशिनिंग’ अत्यंत निंदनीय आहे, अशी तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ही सरकारची दलितविरोधी मानसिकता स्पष्ट करते, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरवादी चळवळीतील प्रमुख नेते राहुल डंबाळे, डॉ. हर्षवर्धन दवणे, डॉ. राहुल ससाणे, स्वप्निल नरबाग, प्रवीण खंदारे, राहुल नगटिळक, प्रकाश दिपके, सुरेखा मेश्राम, आदीसह राज्यभरातून आलेले शेकडो संशोधक विद्यार्थी या आंदोलनात ताकदीने उतरले आहेत.
आंदोलनाच्या दिवशी बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे यांनी बार्टी कार्यालयात विद्यार्थी आणि मान्यवरांशी सविस्तर चर्चा केली होती. मात्र, ठोस तोडगा न निघाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट शासन निर्णयाची होळी करून आपला लढा तीव्र केला. फेलोशिपची संख्या किमान 600 करावी, वयोमर्यादा व लाभार्थी संख्येची अट तातडीने रद्द करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशा मागण्या संशोधक विद्यार्थ्यांनी केल्या असून येत्या काळात लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने दिलाय.