

पुणे: कुटुंबीयासोबत देवदर्शनासाठी गेल्यानंतर एसटी स्थानकावर पोलिस कर्मचारी पत्नीला मारहाण करत होता. त्यांचा वाद सोडवण्यासाठीमध्ये पडलेल्या एका कारचालकास या पोलिस अंमलदाराने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारचालक तब्बल अडीच महिन्यांनंतर शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीनंतर करमाळा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिस अंमलदाराला अटक केली.
अमित सुरेश जाधव (वय ४२, रा. भवानी पेठ) असे या पोलिसाचे नाव आहे. त्याला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. याबाबत शुभम चंद्रकांत भोसले (वय २७, रा. मंगळवार पेठ) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुभम भोसले हे चालक म्हणून काम करतात. ३१ मे २०२६ रोजी ते, त्यांचा भाचा प्रथमेश चव्हाण यांची इर्टिका गाडी घेऊन अमित जाधव यांच्या पत्नी, आई, बहीण व दोन मुलांसह देवदर्शनासाठी घेऊन गेले होते. काही ठिकाणी फिरून रात्री साडेनऊ वाजता ते करमाळा एसटी बसस्थानकाजवळ चहा, नाष्टा करण्यासाठी थांबले असता अमित जाधव अचानक चिडला. तो पत्नीला आणि आई, बहिणीसोबत शिवीगाळ करू लागला.
पत्नीला मारहाण करू लागला. त्यामुळे शुभम व त्याचा भाचा प्रथमेश त्यांची भांडणे सोडवण्याचा खूप वेळ प्रयत्न करू लागले. परंतु, अमित ऐकत नव्हता. त्यांची भांडणे सोडवताना त्याने शुभम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच बाजूला पडलेल्या झाडाच्या काठीने शुभम यांच्या डोक्यात मारल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध झाले. करमाळा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल केले.
तब्बल ४१ दिवस रुग्णालयात उपचार
अमित जाधवने केलेल्या मारहाणीमुळे तब्बल ४१ दिवस उपचार केल्यानंतर भोसले यांना ११ जुलै २०२६ रोजी हॉस्पिटलमधून डिचार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांची तब्येत बरी होत नसल्याने त्यांना घरच्यांनी कर्वेनगर येथील न्युरो केअर सेंटरमध्ये अॅडमिट केले. ते हळूहळू पूर्णत: शुद्धीवर आले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जबाब नोंदवून तो करमाळा पोलिस ठाण्यात पाठवला. करमाळा पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अमित जाधव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२६ रोजी करमाळा पोलिसांनी जाधवला अटक केली. अमित जाधवचे वर्तन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे, अशोभनीय असल्याने पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी त्याला निलंबित केले आहे.