बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि.27) गव्हाच्या लोकवन आणि 2989 या दोन्ही वाणांची उच्चांकी आवक नोंदली गेली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू बाजारात आणल्याने दर स्थिर राहिल.
गव्हासोबतच इतर धान्यांचीही चांगली आवक झाली. यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, तूर आणि गूळ यांचा समावेश असून मक्याची आवक सर्वाधिक नोंदवली गेली.
बाजारात लोकवन गहू 459 क्विंटल, तर 2989 गहू 306 क्विंटल आवक झाली. दोन्ही वाणांना शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कमाल भाव अनुक्रमे 2,700 व 3,151 रुपये नोंदले गेले. आवक वाढली असली तरी सरासरी भाव स्थिर राहिले.
तांबडा मका तब्बल 2,844 क्विंटल आला. एपीएमसीमध्ये मक्याचा दबदबा कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते. पांढऱ्या मक्याची स्थिर आवक होती. गावरान व हायबिड ज्वारीची मिळून आवक 394 क्विंटल आवक झाली. भाव 2,300 ते 4,675 रुपयांच्या दरम्यान राहिले. बाजरीच्या महिको व हायबीड वाणांची एकत्रित आवक 399 क्विंटल नोंदली गेली. सरासरी भाव 2,700 ते 2,900 रुपये राहिले. उडीद, तूर, मूग, हरभरा या डाळींची आवक मध्यम स्वरूपात नोंदली गेली.
उडीद (काळा) : 175 क्विंटल, सरासरी भाव 5,500 रुपये. तूर (तांबडी) : 15 क्विंटल, सरासरी भाव 5,000 रुपये. मूग (हिरवा) कमी प्रमाणात आला, मात्र 8,050 रुपये सरासरी भाव नोंदला. हरभऱ्याच्या दोन्ही प्रकारांना 5,000 ते 5,151 रुपये सरासरी दर मिळाला. खडा आणि बॉक्स गुळाची मिळून आवक 112 क्विंटल झाली. भाव 4,050 ते 4,600 रुपये दरम्यान स्थिर राहिले.