

पुणे : अवैध पिस्तूल विक्रीचे गाव म्हणून ओळख असलेल्या मध्य प्रदेशातील उमरटीतून गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात एक हजार पिस्तुलांची विक्री झाल्याचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. उमरटीतील पिस्तूल कारखान्यांवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी पुण्यासह महाराष्ट्रात पिस्तूल विक्री करणारी साखळी शोधण्यास सुरुवात केली.
या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षात आर्म ॲक्टच्या संदर्भातील दाखल गुन्ह्यांतील संबंधितांच्या झाडाझडतीसह उमरटीत अटक केलेल्या त्या सात जणांकडे चौकशी सुरू केली आहे. त्यांनी नेमके पिस्तूल कोणा-कोणाला पुरवले, याची माहिती पोलिस संकलित करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात उमरटीतून गेल्या काही वर्षात 1000 पिस्तुलांची विक्री झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. परंतु, प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचे सांगितले आहे.
शहरात वर्चस्ववाद आणि टोळीयुद्धातून खुनी खेळ खेळला जात असल्याचे काही वर्षात दिसून आले. त्यात वापरलेली पिस्तुले उमरटीतून आणल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी थेट सीमेवरील उमरटी गावात जळगाव, मध्य प्रदेश एटीएसच्या मदतीने धाडसत्र राबवले. त्यावेळी दोन पिस्तुले व मॅगझीन, पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग, अन्य साहित्य जप्त केले.
टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकरचा खून, गणेश काळे खून, वनराज आंदेकर, शरद मोहोळच्या खुनात वापरलेली पिस्तुलेही उमरटीतूनच आल्याचे समोर आले.
वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून केला. या गुन्ह्यासाठी उमरटीतून पिस्तूल आणले होते. ते पिस्तूल उमरटीतून अटक केलेल्या आरोपींनी दिले. त्यामुळे या एजंटना आयुष कोमकर खून प्रकरणात दाखल असलेल्या मोक्कात सहआरोपी केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंदेकर टोळीने उमरटीतून तब्बल पंधरा पिस्तुले विकत आणल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यातील काही पिस्तूल जप्त केले आहेत. पण, आणखीही काही पिस्तुले मिळालेली नाहीत. त्यामुळे ते पिस्तूल कोणाकडे आहेत, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमानतळ पोलिसांकडे दाखल असलेल्या आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात बंडू आंदेकरला सहआरोपी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.