

अमृत भांडवलकर
सासवड : निवडणुका म्हटले की उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे नियोजन ठरलेले असते. जेवणाशिवाय निवडणूक लढविली जाणे अशक्यच. त्याला पुरंदरची सासवड नगरपालिका निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल.
त्यामुळेच सासवड शहर आणि परिसरातील ढाब्यासह हॉटलमध्ये रंगतदार मेजवान्या रंगताना दिसत आहेत. ’मतोबा’ला प्रसन्न करायचे असेल, तर ’पोटोबा’ची पूजा केलीच पाहिजे, या सूत्राप्रमाणे उमेदवार कार्यकर्त्यांच्या जेवणाची काळजी घेत आहेत.
सासवड नगरपालिका निवडणुकीचा निकालाचा अंदाज बांधणे अशक्य झाले आहे. सोमवारी रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या, तरी शनिवार, रविवार दिवस-रात्र महत्त्वाचे ठरणार आहे. याच काळात लक्ष्मीदर्शनाचे प्रयोगही अनेक ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे.
सासवड नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला गती द्यायची असेल, तर कार्यकर्ते ठणठणीत हवेत आणि त्या प्रयत्नात कोणतीही कसूर किंवा कमीपणा नको, हे उमेदवारांना पक्के माहीत आहे. सासवडला अनेक हॉटेल आहेत. महत्त्वाच्या बैठकीसाठी कार्यकत्यांना हे हॉटेल उपयुक्त ठरू लागली आहेत. या निवडणुकीमध्ये ढाबा संस्कृती प्रसिद्ध झाली आहे. शहरात अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने कार्यकत्यांच्या खाण्या-पिण्याची चांगली चंगळ सुरू आहे. पहिल्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या ताकदवान असल्याने खाण्या-पिण्याच्या खर्चाचा भार ते कधी कधी स्वतःही उचलताना पाहयला मिळत आहे.
सध्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये घमासान सुरू आहे. ठरावीक कार्यकर्त्यांजवळ त्यांना जेवणाची वेळ आणि ठिकाण सांगितले जाते. त्याचबरोबर दिवसभरात प्रचाराचे नियोजनही सांगण्यात येते. दिवसभराच्या कामकाजासह जेवणावळींचे नियोजन केलेले असते. त्यासाठी उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी हॉटेल आरक्षित होऊ लागली आहेत. इच्छुक उमेदवारांच्या घरीही जेवणावळी देऊन कार्यकर्ते व मतदारांची काळजी घेतली जात आहे. एकूणच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सध्या चंगळ सुरू आहे.