

बारामती : बारामती शहरातील वीर गोगादेव मंदिर परिसरात शुक्रवारी (दि. 28) भल्या पहाटे काही नागरिकांना क-हा नदीच्या तीरावर बिबट्या दिसला. दरम्यान वन विभागाने मात्र याचे खंडण केले आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो हा एआय तंत्रज्ञान वापरून केलेला असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणारे नागरिक आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत.
बारामती शहरात शुक्रवारी सकाळी अचानक बिबट्या दिसल्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. क-हा नदीकिनारच्या एका जीममधून काहींनी त्याची छायाचित्रे घेत ती पसरवल्याचे सांगितले जात आहे. शहरभर ही बातमी पसरली. दरम्यान गुरुवारी कसबा परिसरातील जामदार रस्ता भागात बिबट्या आल्याची आवई उठली होती. तत्पूर्वी गत आठवड्यात बारामती तालुक्यातील निरावागज येथे बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक ग््राामस्थांनी सांगितले होते. त्यामुळे वन विभागाने तेथे पाहणी करत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
बारामती शहर व परिसर आणि तालुक्यामध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी अलीकडील काळात उसात वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे. बारामती तालुक्यातही यापूर्वी बिबट्या आढळला होता, त्या वेळी त्याला जेरबंदही केले होते. आता पुन्हा बिबट्या आल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत, तर वन विभाग मात्र त्याचा इन्कार करीत आहे.
सध्या नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत आहेत, अशा स्थितीत बिबट्या आल्याची बातमी पसरल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामतीत बिबट्या दिसल्याचे वृत्त निराधार आहे. या परिसरात आमच्या कर्मचा-यांनी पाहणी केली. कुठेही बिबट्याचे ठसे आढळले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एआय जनरेटेड आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये.
अश्विनी शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती
हिवरे तर्फे नारायणगाव येथील घटना
नारायणगाव : हिवरे तर्फे नारायणगाव येथील प्रशांत यशवंत वाघ यांच्या मालकीच्या 13 शेळ्या बिबट्याने ठार केल्या. दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) मध्यरात्री बारा ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजल्यावर वन विभागाचे वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.
याबाबतची माहिती अधिक अशी की, हिवरे तर्फे नारायणगाव येथे प्रशांत वाघ यांचा गोठा आहे. यात त्यांनी सानियान जातीच्या 15 शेळ्याचे संगोपन केले आहे. शेळ्यांच्या संरक्षणासाठी पत्र्याचे मोठे शेड तयार केले आहे. गोठ्याला लोखंडी तारेचे कंपाउंड आहे. प्रशांत वाघ व त्यांची वृद्ध आई शेळ्यांचे संगोपन करतात.
मुलाला व पत्नीला भेटण्यासाठी वाघ गुरुवारी पुण्याला गेले असता त्यांना बिबट्याने तेरा शेळ्या ठार केल्याचे समजले. त्यामुळे ते गावी आले. त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावला आहे.
दरम्यान, या शेळ्यांवर दोन अगर तीन बिबट्यांनी हल्ला केला असावा असा अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे. बिबट्यांनी दहा शेळ्या आठ फूट उंचीच्या लोखंडी जाळीवरून बाजूला असलेल्या उसाच्या शेतात नेत ठार केल्या.
वनक्षेत्रपाल कांबळे म्हणाले की, या परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असून सूर्यास्तानंतर सूर्यास्तापूर्वी शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करायला जाऊ नये. विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना एकट्याने न जाता त्यांना पालकांनी शाळेत सोडावे. उसाच्या शेताच्या कडेने एकट्याने न जाता सोबतीला जोडीदार घ्यावा. तसेच मोबाईलवर गाणी सुरू ठेवावा. हातामध्ये काठी ठेवावी.