बारामती: बारामती तालुक्यात सध्या क्रमांक असलेल्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. कोणतीही ओळख पटविणारी क्रमांक प्लेट नसतानाही अनेक वाहने राज्यमार्गासह विविध रस्त्यांवर सर्रास धावत असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेषतः टिपर, डंपर व जड वाहने विनाक्रमांक किंवा नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावत आहेत. अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असूनही बारामती आरटीओ विभाग यावर काहीही कारवाई करत नाही.
गेल्या वर्षी बारामतीत टिपरच्या धडकेत वडील व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही संबंधित यंत्रणांनी पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे दिसत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल बारामतीकर उपस्थित करत आहेत.
राज्यमार्गावर तसेच तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर शेकडो विनाक्रमांक वाहने फिरत असल्याचे चित्र असताना, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नाही.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तातडीने मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी, तसेच विनाक्रमांक, विनाकागदपत्रे आणि धोकादायक पद्धतीने धावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.