Ajit Pawar Pudhari
पुणे

Baramati Politics: अजित पवारांनंतर बारामतीचे राजकारण कोणत्या दिशेने?

नेतृत्वाची पोकळी, बदलती समीकरणे आणि सुनेत्रा पवारांसमोरील मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकारण आता एका ऐतिहासिक वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर बदलती राजकीय समीकरणे आणि भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत सध्या अनेक तर्क बांधले जात आहेत. एकूणच, अजितदादांच्या निधनानंतर बारामतीचे राजकारण कोणत्या दिशेला जाणार? याबाबत संपूर्ण राज्यात उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‌‘पॉवर हाऊस‌’ समजले जाणारे बारामतीचे खंबीर नेतृत्व अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकीय क्षितिजावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या चार दशकांपासून वेगवान आणि क्रियाशील राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांच्या निधनामुळे बारामतीचा गड आता खऱ्या अर्थाने पोरका झाला आहे. त्यामुळे आता बारामतीच्या भविष्यातील राजकारणाची गणिते मांडली जात आहेत. ‌‘दादां‌’च्या निधनानंतर बारामतीचा गड कोण सांभाळणार? आणि इथल्या राजकारणाची दिशा कशी असेल? याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांची राजकारण करण्याची पद्धत ही नेहमीच सर्वसमावेशक आणि मुत्सद्दी राहिली आहे. बारामतीत त्यांनी कधीही विरोधकांना संपविण्याचे राजकारण केले नाही, तर त्यांना आपल्या विकासकामांच्या प्रवाहात सामील करून घेतले. राजकारण निवडणुकीपुरते आणि विकास बारा महिने, हे त्यांचे सूत्र होते. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात अनेकदा स्थानिक पातळीवर कट्टर विरोधकांना चुचकारून किंवा त्यांना सत्तेत वाटा देऊन आपल्या बाजूने वळविले होते. मात्र, त्यांच्या पश्चात ही जुळवाजुळवीची पद्धत कायम राहणार की बारामतीत पुन्हा एकदा टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार? हा मोठा प्रश्न आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे. अजित पवारांची ‌‘सकाळी लवकर काम सुरू करण्याची‌’ शिस्त आणि परंपरा त्यांना जपावी लागणार आहे. आगामी काळात त्या बारामतीमधील राजकीय पोकळी भरून काढण्यात सक्षम होतील का? याचे उत्तर येणारा काळच ठरवेल. राज्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार अजितदादांच्या उत्तराधिकारी मानल्या जात असतील, तरी बारामतीचे राजकारण सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली हाताळताना अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांना आता सक्रिय राजकारणात आपली जागा निर्माण करावी लागेल.

बारामतीचा कायापालट करण्यात अजित पवारांच्या नियोजनाचा आणि शिस्तीचा मोठा वाटा होता. प्रशासनावर असलेली त्यांची जरब आणि कामाचा झपाटा, यामुळे बारामतीत अनेक मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले. आता त्यांच्या अनुपस्थितीत प्रशासकीय यंत्रणा त्याच गतीने काम करणार का? हा सर्वसामान्य बारामतीकरांच्या मनातील मुख्य प्रश्न आहे. अजित पवारांनी पेरलेला विकासाचा वारसा आणि त्यांनी जपलेली राजकीय मैत्री पुढे नेण्याचे मोठे आव्हान त्यांच्या वारसदारांसमोर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT