

पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडले जाणार असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिककडून देण्यात आली आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ तसेच अध्यक्ष व डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. वैद्यकीय पथकाने त्यांना पुढील काही दिवस पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
त्यानंतर हळूहळू दैनंदिन कामकाज व सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास सुरुवात करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने पवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.