

पुणे: मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त नेहमीच खास असते. शनिवारी (दि. 14 फेबुवारी) साजऱ्या होणाऱ्या जागतिक प्रेम दिनाच्या (व्हॅलेंटाईन डे) पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 13) बाजारपेठा गुलाबाच्या रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. आपल्या प्रिय व्यक्तीला खास भेट देण्यासाठी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी गिफ्ट शॉप्स आणि चॉकलेट, केक कॉर्नर्सवर तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
लहान आकारापासून ते अगदी 5 फुटांच्या टेडी बिअरपर्यंत विविध प्रकार (बाहुल्या) विक्रीसाठी पुण्यातील विविध बाजारपेठा आणि गिफ्टस शॉपमध्ये उपलब्ध असल्याचे शुक्रवारी दिसले, हे टेडी बिअर खरेदी करण्यासाठी पुण्यातील तरुणाईने दुकाने, बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय फोटो आणि नावाचे प्रिंट असलेले मग (कप) आणि हार्टच्या आकाराच्या उश्यांना मोठी मागणी असल्याचेही दिसले. पाहणीदरम्यान अनेक तरुण-तरुणी या भेटवस्तू खरेदी करताना पाहायला मिळाले. अनेकांनी ‘व्हेलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला प्रीमियम चॉकलेट्स आणि हार्टशेप केकची आगाऊ नोंदणी केल्याचेही यंदा पाहायला मिळाले.फ
गिफ्ट हॅम्पर अन् टेडी बिअरचा ट्रेंड...
यंदा बाजारपेठेत फक्त गुलाबच नाही, तर वैविध्यपूर्ण गिफ्ट हॅम्पर्सना मोठी मागणी असल्याचेही पाहायला मिळाले. यामध्ये आकर्षक टेडी बिअर, सुगंधी अत्तर, सुगंधी मेणबत्त्या आणि खास डिझाइन केलेली शुभेच्छापत्रे यांचा समावेश असल्याचे दिसले. विशेषतः काचेत बंदिस्त केलेली आकर्षक गुलाब प्रतिकृती यंदा आकर्षणाचे केंद्र ठरत असल्याचे दिसले.
कॅडबरी आणि गुलाबांची क्रेझ
प्रेम व्यक्त करताना गोडव्याशिवाय पान हलत नाही, म्हणूनच विविध फ्लेवर्सच्या कॅडबरी आणि चॉकलेट बॉक्सना सर्वाधिक पसंती मिळते. गुलाबांच्या किमती वाढल्या असल्या, तरी डच गुलाब खरेदी करण्यासाठी फुलांच्या स्टॉल्सवर तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचल्याचे चित्र शुक्रवारी (दि. 13) पाहायला मिळाले.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त एक दिवस नाही, तर भावना व्यक्त करण्याची एक संधी असते. यंदा भेटवस्तूंमध्ये खूप नवनवीन प्रकार आल्याने खरेदीचा आनंद द्विगुणित झाला आहे. गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा अधिक सुंदर गिफ्टचे प्रकार बाजारात पाहायला मिळत आहेत. वर्ष पालटले की, नेहमीच काहीतरी नवीन दिसते, तशीच स्थिती गिफ्टच्या या बाजारात यंदाही दिसत आहे. असे असले तरी फार पूर्वीपासूनची शुभेच्छापत्रांची जागा अजूनही जशीच्या तशीच आहे, अजूनही प्रेम व्यक्त करण्यासाठी बहुतांश तरुणाई या शुभेच्छापत्रांची खरेदी करताना दिसत असते.
दिनेश शिंदे, तरुण