

सुवर्णा चव्हाण
पुणे: प्रत्येकाच्या मनातील प्रेमकथा, प्रेमकवितांनी शब्दरुप देण्याचे काम त्या त्या काळातील लेखकांनी केले...ना. सी. फडके, बाबा कदम, योगिनी जोगळेकर, सुहास शिरवळकर अशा दिग्गज लेखकांनी प्रत्येकाच्या प्रेम भावनांना शब्दरुप देत मोकळी वाट दिली अन् त्यांच्या कथा-कादंबऱ्या गाजल्याही... काळ बदलल्यानंतर आजही प्रेमकथा, प्रेम कविता अन् कांदबऱ्यांची छाप तरुणाईच्या मनावर कायम आहे.
नव्या पिढीतील संदीप खरे, स्पृहा जोशी, ज्योती घनश्याम, प्रशांत केंदळे, सागर कळसाईत अन् कस्तुरी देवरुखकर असे कित्येक लेखक लिहिते झाले असून, त्यांच्या प्रेमावर आधारित पुस्तकांना तरुणाईकडून पसंती मिळत आहे. जुन्या पिढीतील लेखकांच्या पुस्तकांना मागणी आहेच. त्याशिवाय नवोदित लेखकांच्या पुस्तकांनाही मागणी आहे. इतकेच नव्हे, तर प्रेमावर आधारित ऑडिओ बुक्स ऐकणाऱ्या तरुणांची संख्याही कमी नाही. जुन्या पिढीच्या लेखकांनी प्रेमविश्वाला बहर दिला. प्रत्येकाच्या रोमँटिक कादंबऱ्या, कथा आणि कवितासंग््राहांनी वाचकांच्या मनावर वेगळी छाप उमटवली.
पुढे काळ बदलला आणि आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी अधिक रोमँटिक झाली आहे. याच पिढीसाठी लिहिणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांच्या पुस्तकांनाही चांगला प्रतिसाद आहे. अनोख्या पद्धतीने भेटलेल्या प्रेमाची कथा असो वा प्रेमाच्या नात्यातील दुरावा... अशा वेगवेगळ्या विषयांवरील प्रेमावरील पुस्तके तरुण वाचत आहेतच. पण, प्रेम कविता, गझल आणि चारचोळ्यांच्या पुस्तकांचीही चलती आहे. त्याशिवाय प्रेमावरील रोमँटिक अशा ऑडिओ कथा आणि बुक्सलाही तरुणांकडून पसंती असून, बहुतांश प्रकाशकांकडून प्रेमकथा, कवितासंग््राह आणि कवितासंग््राहही प्रकाशित केले जात आहेत.
विशेषत: प्रेम पुस्तकांमध्ये एआयद्वारे तयार केलेली प्रेमावरील चित्रांचा समावेश केला जात आहे. त्यामुळेच कुठेतरी या पुस्तकांना आणखी प्रभावीपणा आल्याने प्रेम पुस्तके तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. अनेक तरुण प्रेमकथा, कविता लेखनाच्या विश्वात उतरले असून, अनेकांनी आपल्या प्रेमकथेवरील पुस्तकही लिहिले आहे आणि त्यांच्या या पुस्तकांनाही चांगला प्रतिसाद आहे. काळ कोणताही असो प्रेमकथांचे विश्व बदलत असले तरी त्यावर आधारित पुस्तकांना मागणी कधीच कमी होणार नाही, असे प्रकाशक सांगतात. याविषयी चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील म्हणाले, जुन्या पिढीतील दिग्गज लेखकांच्या पुस्तकांना मागणी आहेच. पण, नव्या पिढीतील लेखकांच्या पुस्तकांनाही मागणी आहे. अनेक नवोदित लेखक लिहिते झाले आहेत आणि त्याच पिढीतील काही तरुणांची प्रेमकथेवरील, कवितेवरील पुस्तके
आम्ही प्रकाशित केली आहेत. आम्ही आतापर्यंत 20 पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रेमावर आधारित पुस्तकांना वाचकवर्ग राहिलेला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण प्रत्येकाच्या मनात प्रेमाचा एक कोपरा दडलेला असतो. खासकरुन प्रत्येक तरुणाच्या मनात प्रेम भावना कोणाविषयी तरी दडलेलीच असते. त्यामुळे अनेकजण याच भावनांना शब्दरुप देत आपली प्रेमकहाणी पुस्तक रुपाने मांडत आहेत आणि या पुस्तकांना चांगला प्रतिसाद आहे.
सोशल मीडियावर गाजताहेत नवोदित लेखकांच्या प्रेमकविता
प्रेम कविता लिहिणारे, आपली प्रेमकहाणी शब्द करणाऱ्या नवोदित लेखकांसाठी सोशल मीडिया व्यासपीठ ठरत असून, त्यांच्या प्रेमावरील कविता, गझल आणि चारओळीसुद्धा इन्स्टाग््रााम, फेसबुकवर गाजत आहेत. त्यामुळे पुस्तक असो वा सोशल मीडियावर प्रेमावरील लेखनाला पसंती आहे. अनेकजण त्यांच्या प्रेमाचे अनुभव सोशल मीडियावर बोलके करत असून, नव्या पिढीच्या या लेखकांच्या रोमँटिक कथा, कविता, गझलला सोशल मीडियावर पसंतीची पावती मिळत आहे. अनेकजण या माध्यमातून आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करत आहेत.