Political Realignment Baramati Pudhari
पुणे

Political Realignment Baramati: राजकीय सरमिसळ मतदारांच्या पचनी पडेल का ?

बारामतीतील समीकरणावर मतदारच संभमात मतदारांचीच लागली खरी कसोटी

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बारामती नगरपरिषद निवडणूक सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. यंदा झालेली अभूतपूर्व व ऐतिहासिक सरमिसळ मतदारांना झटका देणारी ठरली आहे. ही सरमिसळ आता मतदारांच्या पचणी पडते का आणि ते काय निर्णय घेतात? याकडे आता लक्ष लागले आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे राजकीय वातावरण अनपेक्षितरीत्या तापू लागले आहे. एकेकाळी विळ्या-भोपळ्याचे नाते असलेले नेते आज एकाच व्यासपीठावर दिसू लागले आहेत, तर काही जुने सहकारी वेगवेगळ्या गटांकडे स्थलांतर करीत आहेत. ‌’कोणीच कोणाला वर्ज्य नाही‌’ अशी परिस्थिती निर्माण होत असून सर्वच पक्षांत मोठी सरमिसळ झाल्याने या निवडणुका नेहमीपेक्षा वेगळ्याच वळणावर जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. प्रत्येक प्रभागात आता चहापानापासून ते अगदी तरुण मंडळे, गणेश मंडळापर्यंत सुरू असलेली एकमेकांच्या भेटीगाठी, गुप्त संवाद आणि नव्या मैत्री-शत्रुत्वाच्या गोष्टींनी राजकारणात चर्चेची झाली आहे. कोण कोणाच्या गटात आहे, कोण कोणाला पाठिंबा देणार, कोण कोणत्या व्यक्तीचे आतून काम करणार, याचा नेमका अंदाज कोणालाच लागत नसल्याने सर्वच पातळ्यांवर संभमाचे वातावरण आहे.

बारामती नगरपरिषदेत यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेरच्या टप्प्यात मोठा डाव टाकला. मागील निवडणुकीत पवारांच्या उमेदवारांचा पराभव करणाऱ्या जयसिंग (बबलू) देशमुख, विष्णूपंत चौधर यांना मधल्या काळात पवार यांनी आपल्याकडे खेचले. पालिकेचे मागील काळातील विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांच्यावर विरोधकांची मोठी मदार होती. नाट्यमय घडामोडीत सस्ते यांनीही राष्ट्रवादीचा गमजा गळ्यात घालत उमेदवारी मिळवली. त्यामुळे ऐनवेळी विरोधकांची बाजू थोडी लंगडी झाली. राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट निवडणुकीत उतरला आहे. भाजप-शिवसेना, बसपा व अन्य पक्ष आपापल्या पद्धतीने टक्कर देत आहेत. राजकीय सरमिसळ मतदारांच्या दृष्टीनेही आश्चर्यकारक ठरत आहे. ‌’पक्ष वेगळे असले तरी विकासासाठी एकत्र‌’ अशी भाषा अनेकांकडून वापरली जाऊ लागल्याने मतदारही संभमात पडले आहेत.

निवडणूक प्रचाराची धुरा हाती घेण्यापूर्वीच या बदलत्या समीकरणांनी मतदारांवर मोठे दडपण आले आहे. उमेदवारांनी पक्ष बदलला तरी त्यांच्या कामाचा मागील इतिहास, स्वभाव, सामाजिक व राजकीय संबंध आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणा व पारदर्शकता या गोष्टींचे मोजमाप मतदारांनाच करावे लागणार आहे. मतदारांचीच आता खरी कसोटी लागल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कारण सरमिसळीतून तयार होणाऱ्या नव्या आघाड्या, तडजोडी आणि हितसंबंध यांच्यातून खऱ्या अर्थाने ‌’योग्य‌’ उमेदवार ओळखणे हे कठीण होणार आहे.

येणाऱ्या काही दिवसांत प्रचाराचा जोश वाढेल, अजून काही मंडळी इकडे-तिकडे करण्याची शक्यता आहे. आतून वेगळे काम करण्याची काहींची तयारी दिसते आहे. निश्चितच त्यामुळे मतदारांपुढे मोठा संभम निर्माण झाला आहे.

अपक्षांची संख्या यंदा वाढली

बारामतीत यंदा अपक्षांची संख्या मोठी आहे. अपक्षांनी काही ठिकाणी नाकी दम आणला आहे. अनेक प्रभागात या ना त्या मार्गाने अपक्षांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी सर्व त्या बाबी केल्या जात आहेत. त्यातून अपक्षांवर मोठे दडपण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT