बारामती: जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग््रेास पक्षांतर्गत निष्ठावंतांना डावलण्यावरून काहीशी नाराजी दिसून येत आहे. उमेदवारीवाटपात निष्ठावंत कार्यकर्ते व अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. गावकी-भावकीच्या वादात तिसऱ्याला उमेदवारीचा लाभ मिळाल्याचे चित्र काही मतदारसंघांत दिसून येत आहे. काही ठिकाणी कायम पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना संधी देण्यात आल्याने निष्ठावंत कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये तीव नाराजी आहे.
या वेळी जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधला गेलेला दिसून येत नाही. जवळपास सर्वच गटांमध्ये नवखे उमेदवार देण्यात आल्याने अनुभवाचा अभाव आणि संघटनात्मक विस्कळीतपणा जाणवत आहे. मात्र, विरोधकांची ताकद तुलनेने कमी असल्याने पक्ष देईल त्या उमेदवाराचा नाइलाजाने प्रचार करण्याची भूमिका अनेक कार्यकर्ते घेताना दिसत आहेत. परिणामी, निवडणुकीनंतर नाराजी उघडपणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही गटांत अत्यंत उमद्या आणि नवी कोरी पाटी असणाऱ्या, समाजकार्यात अग््रेासर असलेल्या तरुणांना संधी दिल्याने मतदार खूष आहेत. पक्षांतर्गत वाढणारे मतभेद, गटबाजी आणि असंतोष भविष्यात राष्ट्रवादी काँग््रेाससाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग््रेासचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालून नाराजी दूर करावी, निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे आणि अंतर्गत वाद मिटवावेत, अशी मागणी पक्षातील विविध स्तरांतून होत आहे.
दोन गणांत भाजपविरोधात उमेदवार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. 24) तालुक्यात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. या वेळी ही नाराजी पवार कशी दूर करतात? याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यात एकही जागा वाट्याला न आलेला राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार गट या वेळी उपस्थित राहणार का? दोन गणांमध्ये भाजपविरोधात उमेदवार देण्यात आलेले नाहीत. तेथे पवार काय निर्णय घेतात? याकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.