

भोर: 12 तोळ्यांचे सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची अडीच तोळ्यांची सोन्याची पोत दोन चोरट्यांनी लंपास केली. भोर शहरातील मंगळवार पेठेतील आठवडे बाजारात मंगळवारी (दि. 20) ही घटना घडली. याप्रकरणी पळसोशी (ता. भोर) येथील अलका वसंत म्हस्के (वय 65) यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील आठवडे बाजारात दुपारच्या सुमारास दोन चोरट्यांनी अलका म्हस्के यांच्याशी संवाद साधत, ‘आजी, आम्ही तुम्हाला 12 तोळ्यांचे सोन्याचे बिस्कीट देतो. त्या बदल्यात तुमच्या गळ्यातील पोत द्या,’ असे सांगून त्यांना भुलवले. त्यानंतर खोटे, कोणत्यातरी धातूचे बिस्कीट देत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची, 160 सोन्याचे मनी असलेली तीनपदरी पोत घेऊन ते पसार झाले.
या घटनेत म्हस्के यांचे 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोने चोरीस गेले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धर्मवीर खांडे करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी आठवडे बाजार किंवा अन्य ठिकाणी अनोळखी व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ भोर पोलिसांशी संपर्क साधावा किंवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींना माहिती द्यावी, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.