

ओतूर: ओतूर-धालेवाडी गटात व ओतूर रोहकडी गणाच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व मनसे यांच्यात खरी लढत आहे. या मतदारसंघात गेली काही वर्षांत ठळक विकासकामे झालेली नाहीत. उमेदवार आमच्या गावाकडे, वस्तीकडे कधी फिरकलेच नाहीत अशीही चर्चा आहे.
मतदारसंघात कोणत्या गावात कोणती योजना राबविण्यात आली? अनेक गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण नक्की थांबली का...? त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरला का? की 3 ते 4 किलोमीटरवरची पाण्यासाठीची पायपीट थांबली...? गावे हगणदारीमुक्त झालीत का? हे अवलोकन आवश्यक ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी कोणत्या कार्यकर्त्याने वेळोवेळी पाठपुरावा केला? जलजीवन योजनेच्या पाइपलाइनमुळे खोदण्यात आलेले गावोगावचे रस्ते पूर्ववत करण्यासाठी कोणी सरकारला धारेवर धरले? असा सवाल मतदारांनी उमेदवारांना केला आहे.
माळशेज रेल्वेचे घोडे नेमके कुठे अडले? रस्ता वाहतुकीचे काय...? गावागावांतील सर्व रस्ते सुस्थितीत आहेत का? सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी पुरेशा पाण्याचा प्रश्न किती प्रमाणात सुटला? गाव व वाड्यावस्त्यांवरील कोलमडलेले कचरा व्यवस्थापन सुरळीत आहे का? उघड्या गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यासाठी काय काय उपाययोजना आहेत? अद्यापी शेतकऱ्यांचे किती प्रश्न सोडवले? शेतमालाला बाजारभाव मिळण्यासाठी काय केले? असे प्रश्न यानिमित्त उपस्थित केले जात आहेत.
बिबट मुक्तगाव करण्यासाठी व बिबट्यांचे मानवी हल्ले रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार? गावागावांतील अतिक्रमणांचा मुद्दा आजपर्यंत कोणीच कसा मार्गी लावला नाही, करोडो रुपये खर्च करून उभारलेली ओतूर ग््राामीण रुग्णालयाची इमारत अद्यापी वापरात का येत नाही? रुग्णालयाअभावी जाणारे कित्येकांचे प्राण कोण वाचवणार? असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मतदारसंघात आहेत. या समस्यांचे निराकरण कसे करणार याबाबत कोणच व्यक्त होत नसल्याने मतदारांमध्ये खदखद आहे. नागरी समस्यांचे खरोखर निराकरण होईल, की पुन्हा समस्या जैसे थे राहतील, असा ही प्रश्न मतदार विचारत आहेत.