बारामती : नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीची तारीख 21 नोव्हेंबर ही होती. या दिवशी बारामतीत 77 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. आठ जागा बिनविरोध झाल्या, तरीही नगराध्यक्षपदाच्या एका आणि नगरसेवकपदाच्या 33 जागांसाठी बारामतीत 160 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 50 हून अधिक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. पक्षीय चिन्हावर लढणार्या उमेदवारांनी चिन्हासह प्रचार सुरू केला आहे, परंतु अद्याप चिन्ह वाटपच नसल्याने अपक्षांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार बुधवारी (दि. 26) चिन्ह वाटप केले जाणार आहे.
बारामतीत नगराध्यक्षपदासाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात आठ उमेदवार विविध पक्षांचे आहेत. तर सहा जण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. नगरसेवकपदाच्या 41 पैकी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या आठ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित 33 जागांसाठी विविध पक्षांचे तसेच अपक्ष मिळून 145 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राष्ट्रवादीचे 33 उमेदवार त्यांच्या अधिकृत चिन्हावर लढत आहेत.
राष्ट्रवादी (श. प.) गटाला सर्व जागी उमेदवार मिळालेले नाहीत, काही ठिकाणी त्यांनी समविचारी पक्षांना सोबत घेतले आहे. पण जेथे अर्ज दाखल झाले तेथे ते चिन्हावर लढत आहेत. भाजप-शिवसेना व अन्य पक्ष चिन्हावर लढत आहेत. बारामतीत अपक्षांची संख्या मोठी आहे. सुमारे 50 हून अधिक अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना अद्याप चिन्ह न मिळाल्याने प्रचार करताना त्यांची अडचण होत आहे. मतदारांना चिन्ह कोणते सांगायचे हा मोठा पेच त्यांच्यापुढे आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 26 रोजी चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर दि. 30 पर्यंत प्रचार कालावधी आहे. चार दिवसात त्यांना आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख व चिन्ह वाटपाची तारीख यात मोठे अंतर असल्याचा परिणाम अपक्षांच्या प्रचारावर झाला आहे.
बारामती नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्ष व सदस्यपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना बुधवारी (दि. 26) चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यासाठी उमेदवार अथवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने दुपारी 12 वाजेपासून उपस्थित रहावे, असे आवाहन बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी केले आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी बुधवारी प्रथमतः अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. त्यानंतर प्रभाग 1 ते 20 मधील अन्य उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे, असेही डॉ. राजापूरकर यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांना मिळतोय कमी कालावधी
दौंड : दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता सर्वच पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. प्रचाराकरिता थोडाच कालावधी उमेदवारांना मिळाला आहे. त्यातच अद्याप अपक्षांना त्यांचे निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. बुधवारी (दि. 26) अपक्षांना चिन्हाचे वाटप होणार आहे. त्यामुळे आपापल्या प्रभागात स्वतःचे चिन्ह पोहोचवण्याकरिता त्यांना जेमतेम पाच दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
दौंड नगरपालिकेची निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. असे असले तरी अजूनही कोणत्याही मोठ्या नेत्यांची दौंड शहरात सभा झालेली नाही. त्यामुळे शेवटच्या तीन-चार दिवसात प्रत्येक जण सभा घेणार असल्याचे सांगत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जे मोठे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत, त्यांनी एकमेकांविरोधात टीका करणे टाळल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
ही निवडणूक नागरिक संरक्षण मंडळ, भाजपा, रिपाइं व पीआरपी हे एकत्रितपणे लढवत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) एकत्रित आले आहेत. यंदा नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाकरिता असून नगराध्यक्षपदाकरिता तीन प्रमुख उमेदवारांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. असे असताना अपक्षांना मात्र निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.