Crop Disease Purandar: कांदा, मिरची, ज्वारीवर रोगांचा प्रादुर्भाव
परिंचे : पुरंदर तालुक्यातील वीर, परिंचे, माहूर, तोंडल, हरणी, यादववाडी, हरगुडे, पिंपळे, पांगारे आणि परिसरातील कांदा व इतर तरकारी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
धुके, ढगाळ वातावरणामुळे पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. धुके,थंडीचा तडाखा यामुळे कांद्याच्या रोपांवर करपा तसेच मर रोग पडला आहे. यामुळे कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडत आहेत. आगामी काळात कांद्याचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु, वातावरण साथ देत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
कांदा पिकाबरोबर टोमॅटो, मिरची, हरभरा, ज्वारी तसेच पालेभाज्यांवरही रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये थंडीचाही जोर वाढला होता. परंतु, पुन्हा हवामानात बदल झाल्याने थंडी कमी होत उष्मा वाढला आहे. यामुळे ज्वारी, कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यास आळा घालण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारत आहेत. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. कांद्याच्या भावात अपेक्षित सुधारणा न झाल्यास शेतकऱ्यांना तोटा होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. लहरी हवामानामुळे पिकाला मोठा फटका बसू शकतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने शेतकरी चिंताग््रास्त झाला आहे.
कांद्याची पात ही पिवळी पडत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या दिवसांत पिकांना थंडी पोषक असते. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे. शेतकऱ्यांनी वेळीच औषध फवारणी केली तर नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते.
संदीप कदम, उप कृषी अधिकारी पुरंदर

