

पुणे : गुंड शरद मोहोळ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनासह मागील पाच वर्षांत झालेल्या गुन्ह्यांत मध्य प्रदेशातील उमरटी गावात बनवण्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलचा वापर करण्यात आला होता.
पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड भागात असे 700 ते 800 शस्त्रे पुरवण्यात आली होती. गरज पडल्यास पुन्हा त्या गावात घुसून कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
केवळ कारवाई करून थांबणार नाही, तर त्यांची पुरवठा साखळीही मोडून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, निखिल पिंगळे उपस्थित होते. या कारवाईत सहभागी 150 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी प्रत्यक्ष योजनेची तयारी आणि कारवाई कशी केली याची माहिती दिली. पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावातील कारखान्यांवर छापा टाकून तब्बल 50 भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत 47 जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त केला आहे. पुणे शहरात येणारी बहुतांश शस्त्रे उमरटीमधूनच येत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
जमिनीत पुरलेली शस्त्रेही शोधली
जळगावऐवजी मध्य प्रदेशाच्या आतल्या मार्गाने मध्य प्रदेशात प्रवेश
कुठेही थांबा नाही गाडीतच जेवण
आरोपी गावातून पळून जाऊ शकणाऱ्या रस्त्यावर गस्त
प्रतिकार झाल्यास बळाचा वापर करण्याची तयारी
जमिनीत पुरलेली शस्त्रेही शोधून काढली
‘तुमच्यापर्यंत पोहचून कारवाई करू’ असा स्पष्ट संदेश दिला
संशय येऊ नये म्हणून खासगी गाड्यांचा वापर
यापूर्वी उमरटीमध्ये कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी एकत्र येऊन पोलिसांवर दगडफेक, गोळीबार असा प्रकार केला. त्यामुळे पुणे पोलिसांनी या वेळी विशेष दक्षता घेतली होती. दंगल नियंत्रक पथक, जलद कारवाई पथक, बॉम्ब शोधक पथकही यात सहभागी होते. उमरटीमध्ये पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. ड्रोनद्वारे नजर ठेवली. सीसीटीव्ही बसवले होते आणि त्याचे थेट प्रक्षेपण 700 किमी अंतरावर असलेल्या पुण्यात पाहण्याची सोय होती.
प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले होते. दरम्यान, या कारवाईसाठी मध्य प्रदेश पोलिसांची काय भूमिका असेल याबद्दल शंका होती. मात्र स्थानिक पोलिस तसेच मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने मोठी मदत केली. त्यांनी पुरवलेली शस्त्रे ज्या गुन्ह्यात वापरली गेली आहेत, त्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. अनेकांवर मोक्का अंतर्गतही कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.