बारामती: भीषण उन्हाळा, रिकामी शेते, पाण्यासाठी हवालदिल झालेले शेतकरी, अशा परिस्थितीत जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा मोठा फटका जनाई व शिरसाई उपसा सिंचन योजनांना बसला आहे. नियोजित प्रमाणात पाणी न सोडल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावे अक्षरशः तहानलेली आहेत. येथील शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
खडकवासला कालव्यातून जनाई उपसा योजनेसाठी वरवंड (ता. दौंड) येथील तलावात, तर शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी शिर्सुफळ तलावात पाणी सोडण्यात येते. यंदाच्या उन्हाळी आवर्तनासाठी सुरुवातीला जनाई योजनेसाठी 325 दशलक्ष घनफूट, तर शिरसाईसाठी 225 दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, मार्च महिन्यात पुण्याजवळ कालवा फुटल्याच्या घटनेनंतर हे नियोजन कमी करण्यात आले. त्यानुसार जनाईसाठी 300 दशलक्ष घनफूट, तर शिरसाईसाठी 200 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर करण्यात आले.
उपसा सिंचन विभागाने त्यानुसार पाणीवितरणाचे आराखडे तयार केले होते. मात्र, खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नियोजित प्रमाणात पाणीच सोडले नाही. त्यामुळे दोन्ही योजना अडचणीत आल्या. प्रत्यक्षात जनाई योजनेसाठी सुमारे 190 दशलक्ष घनफूट, तर शिरसाईसाठी 170 दशलक्ष घनफूटच पाणी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, खडकवासला पाटबंधारे विभागाकडून जनाईसाठी 355 दशलक्ष घनफूट व शिरसाईसाठी 244 दशलक्ष घनफूट पाणी सोडल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, कालव्यातून व साठवण तलावांत स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने विविध पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी वळविण्यात आल्याने तसेच बाष्पीभवन व जमिनीत जिरणाऱ्या पाण्यामुळे प्रत्यक्षात योजनांना अपेक्षित पाणी मिळाले नसल्याची माहिती समोर येत आहे.
जनाई योजनेतील अनेक गावे कोरडी
जनाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील बारामती तालुक्यातील नारोळी, दंडवाडी, काळखैरेवाडी, राजबाग खैरेपडळ, आंबी खुर्द, बोरकरवाडी, कुतवळवाडी, चांदगुडेवाडी, पानसरेवाडी या गावांसह सुपे परिसरातील तलावांना पुरेसे पाणी मिळालेले नाही. तसेच, दौंड तालुक्यातील जिरेगाव, वासुंदे, रोटी आणि पुरंदर तालुक्यातील राजुरी, रिसे, खोर आदी गावांनाही योजनेचे पाणी पोहचलेले नाही.
शिरसाई योजनेतही तीव टंचाई
शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील अंजनगाव, जळगाव सुपे, सोनवडी सुपे व उंडवडी कडेपठार परिसरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यापैकी अंजनगाव व जळगाव सुपे या गावांना अपेक्षित प्रमाणात पाणीच मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे.
पुन्हा पाणी सोडणार
आधीच दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर विभागाच्या हलगर्जीपणाने अक्षरशः मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे. पाण्यावर अवलंबून असलेली पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतकऱ्यांसमोर उभ्या पिकांचे अस्तित्व टिकविण्याचे संकट निर्माण झाले आहे. याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले की, जनाई-शिरसाई उपसा योजनेसाठी पुन्हा लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे.
या वेळी कालवा सल्लागार समितीची बैठकच घेण्यात आली नाही. अधिकाऱ्यांनी उन्हाळी आवर्तनाचे नियोजन चुकीच्या पद्धतीने केले. मंजूर कोट्यातील पाणी तातडीने उपलब्ध करून न दिल्यास तीव आंदोलन छेडण्यात येईल.पोपटराव खैरे, सदस्य, खडकवासला कालवा सल्लागार समिती