ओतूर : उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर दराअभावी मोठे संकट ओढवले आहे. सध्या केळीला फक्त 4 ते 5 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने येथील बहुतांश शेतकऱ्यांनी केळीची तोडणीही केली नाही. परिणामी, घड झाडालाच पिकून खराब होऊ लागल्याचे चित्र या भागात दिसत आहे.(Latest Pune News)
अणे-माळशेज पट्ट्यातील 50 हून अधिक गावांमधील शेतकरी नियमित केळी या नगदी पिकाचे उत्पादन घेतात. या पिकामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. आता मात्र कधी नव्हे तो केळीने शेतकऱ्यांना धक्का दिल्याचे बोलले जाते. या दर्जेदार केळीला अत्यल्प म्हणजेच 4 ते 5 रुपये प्रतिकिलो इतका नीचांकी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने येथील केळी उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
अणे, बेल्हे, आळे, राजुरी, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार, गायमुखवादी, उंबज, पिंपळवाडी, काळवाडी, खामुंडी, डुंबरवाडी, ओतूर, रोहकडी, आंबेगव्हाण, चिल्हेवाडी, पाचघर, धोलवड, आहिनवेवाडी, उदापूर, मांदारने, हिवरे, ओझर, ठिकेकरवाडी, डिंगोरे, पिंपळगाव जोगा आदी 50 हून अधिक गावांच्या परिसरातील वाड्या-वस्त्यांवर हजारो हेक्टर शेतीक्षेत्रात दर्जेदार केळी पिकांचे उत्पादन घेतले जाते.
केळीचे उत्पादन घेताना शेत तयार करून वाफे बांधणी, महागडी केळी रोपे लागवड, ड्रिप बसविणे, खते, फवारणी, मजुरी, अंगमेहनत, वाहतूक वगैरे असा एकरी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये इतका खर्च येतो, तर एकरातून 28 ते 30 टन केळीचे उत्पादन निघते. आता मिळत असलेल्या 5 रुपये प्रतिकिलो दरातून शेतकऱ्याला सुमारे दीड लाख रुपये प्रतिएकरातून मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे केळी उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे सध्या शेतातील उभ्या झाडावरच लटकलेले केळीचे लंगर पिकून खराब होऊ लागले आहेत.
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, जोरदार वाहणारे वारे, यामुळे केळी पिके जमीनदोस्त झाली आहेत. नैसर्गिक आपत्तींना तोंड देत दर्जेदार मालाचे उत्पादन घेतले. त्यालाही योग्य दर मिळत नाही. आता दराअभावी केळी उत्पादकांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? असा परखड सवाल शेतकरीवर्ग करू लागला आहे. या अस्मामी आणि सुलतानी संकटामुळे केळी उत्पादकांवर मोठे संकट ओढवल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अणे-माळशेज पट्ट्यात शेकडो केळी उत्पादक शेतकरी, तर फक्त 4 ते 5 व्यापारी केळी खरेदीदार आहेत. केळीचा दर ठरविणे हे सर्वस्वी त्यांच्याच हाती असते. त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो. त्यामुळे शेकडो केळी उत्पादक नुकसान सहन करीत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून बाजारभावाअभावी केळी खरेदी बंद झाली आहे.धनंजय डुंबरे केळी उत्पादक शेतकरी, ओतूर
केळीचे दर सातत्याने नीचांकी राहिल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अर्थकारण फिरायला तयार नाही. व्यापारी माल न्यायला टाळाटाळ करीत असल्याने मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अशा परिस्थितीत आम्हा सर्वांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झालेली आहे.विवेक घोलप केळी उत्पादक शेतकरी