

पुणे : दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्याच्या प्रकरणात व देशविरोधी कारवाई केल्या प्रकरणात पुण्यात 19 ठिकाणी दहशतवादविरोधी पथकाने छापेमारी करत काहीजणांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्याच्या विश्लेषणाअंती ‘एटीएस’ने बंदी असलेल्या ‘अल-कायदा’शी संबंध आलेल्या संशयित दहशतवाद्याला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून कुर्ला-बेंगलोर एक्स्प्रेस या रेल्वेतून उतरण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या. सोमवारी ही कारवाई ‘एटीएस’ने केली.
झुबेर इलियास हंगरगेकर (कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ‘अल-कायदा’शी संबंध आल्यासंदर्भात ‘एटीएस’ने त्याच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे.
8 एप्रिल 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अजंठा चौकात असलेल्या एका साडीच्या दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता. यात या दहशतवाद्यांनी एक लाखाची रोकड चोरी करून नेली होती. पुणे मोड्युल प्रकरणातील दहशतवाद्यांना कोथरूडमध्ये पकडल्यानंतर त्यांचा साताऱ्यातील दरोड्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा तपास पुणे ‘एटीएस’ करत आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयितांकडे केलेल्या चौकशीत नवीन नावे निष्पन्न झाल्याने शहरात 19 ठिकाणी छापेमारी केली होती.
देशविरोधी कारवायांत सहभाग
अटक केलेल्या हंगरगेकर याच्या मोबाईलमधून व इलेक्टॉनिक साहित्यातून ‘एटीएस’ने महत्त्वपूर्ण पीडीएफ फाईल जप्त केल्या आहेत. त्यामध्ये तो ‘अल-कायदा’ या बंदी असलेल्या संस्थेशी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्याकडे आढळून आलेल्या साहित्यातून तो देशविरोधी कारवाईत गुंतल्याचेही समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याच्याकडून जप्त केलेल्या एका पीडीएफमधून बॉम्ब कसा बनवायचा याचा फॉर्म्युला (आयईडी) सापडला आहे.
...असे पकडले रेल्वेतून
‘एटीएस’ला अगोदरच कुर्ला-बेंगलोर एक्स्प्रेस रेल्वे गाडीतून दहशतवादी पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ‘एटीएस’ने सोमवारी (दि. 27) सकाळपासूनच पुणे रेल्वे स्थानक परिसरात त्याला पकडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ‘एटीएस’चे अधिकारी साध्या वेशात रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यामुळे प्रवाशांमध्ये कुजबुज होऊ लागली. ‘एटीएस’ अधिकाऱ्यांनी लोहमार्ग पोलिसांची मदत घेतली अन् झुबेरला रेल्वेतून उतरण्यापूर्वीच ताब्यात घेतले.
मोबाईलमध्ये बॉम्ब बनविण्याचा फॉर्म्युला
झुबेर हंगरगेकर याला अटक करून ‘एटीएस’च्या पथकाने न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला ‘एटीएस’बद्दल काही तक्रार आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने ‘एटीएस’ने आपल्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्याच्याशी मी असहमत असल्याचे सांगितले. तुम्ही ‘एटीएस’ने सादर केलेली कॉपी पाहिली का? अशी विचारणा केली. त्यावर तो म्हणाला, मी रेल्वेने प्रवास करत होतो. पुणे रेल्वे स्थानकावर येताच मला ‘एटीएस’ने पकडून त्यांच्या कार्यालयात नेले. मला वकिलाशी संपर्क साधता आला नाही.
विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवाद करताना सांगितले, आरोपीच्या मोबाईलमधून पीडीएफ फाईल मिळाल्या आहेत. त्यामध्ये ‘अल-कायदा’ या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित माहिती मिळाली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आरोपीच्या चौकशीतून आणखी काहींचा सहभाग यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव झुबेरला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.