

पुणे : जनता वसाहत परिसरातील गल्ली नंबर 88 ते 108 या भागातील नागरिक गेल्या 17 दिवसांपासून तहानलेले आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तीव पाणी टंचाईमुळे नागरिकांचा बांध फुटल्याने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी पर्वती विभागातर्फे स्वारगेट पाणी पुरवठा विभागावर हंडा-कळशी घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. (Latest Pune News)
जनता वसाहतीला तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच वाघजाई येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सुरक्षारक्षक नेमून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना विभागप्रमुख सूरज लोखंडे यांनी केले.
या वेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे, गटनेते अशोक हरणावळ, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, संघटक पराग थोरात, किशोर रजपूत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या या मूलभूत गरजांकडे जर दुर्लक्ष केले गेले, तर पुढील काळात तीव आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. तसेच या आंदोलनातून नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जनतेच्या तहानेचा प्रश्न हा आता आमचा लढा बनला आहे, असे मत शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.