Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Balgandharva Award 2026: बालगंधर्व पुरस्कार 2026: ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे यांचा सन्मान

मराठी संगीत नाटक परंपरेच्या जतनासाठी महापालिकेने अधिक ठोस पावले उचलावीत; ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मराठी संगीत नाटकाची समृद्ध परंपरा जतन करण्यासाठी महापालिकेने अधिक ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ज्येष्ठ कलाकार सुरेश साखळकर यांनी केली. तसेच, या परंपरेच्या संवर्धनासाठी आवश्यक ती माहिती, मार्गदर्शन आणि सहकार्य आम्ही देण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

पुणे महापालिकेतर्फे कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना साखळकर यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यंदाचा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक चंद्रकांत काळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच, मागील काही वर्षातील पुरस्कारांचे वितरण ही या कार्यक्रमात केले. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आयुक्त नवल किशोर राम, यंदाचे बालगंधर्व पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक चंद्रकांत काळे, ज्येष्ठ कलावंत व अभिनेत्री निर्मला गोगटे, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. रेवा नातू आदी मान्यवर उपस्थित होते.

साखळकर म्हणाले की, पुणे आणि बालगंधर्व यांचे नाते अतूट आहे. बालगंधर्व यांच्या कलाजीवनाला पुण्यातच खऱ्या अर्थाने बहर आला आणि त्यांच्या स्मृती जपण्याचे काम महापालिका सातत्याने करत आहे, त्याबद्दल महापालिकेचे कौतुक आहे. बालगंधर्व यांच्या योगदानामुळे मराठी संगीत नाटकाला सुवर्णकाळ लाभला. 'बालगंधर्व' ही पदवी सार्थ ठरण्यामागे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांचे योगदान असल्याचे साखळकर यांनी नमूद केले. मराठी संगीत नाटक ही केवळ कला नसून, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगत साखळकर म्हणाले, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत. या कामासाठी आवश्यक ती माहिती, अभ्यास आणि सहकार्य आम्ही आनंदाने करू.

पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक चंद्रकांत काळे म्हणाले, "बालगंधर्वांसारख्या असामान्य कलावंताच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. मात्र, त्याहून अधिक आनंद याचा आहे की, या निमित्ताने अनवट वाटेने काम करणाऱ्या कला चळवळीची दखल महापालिका आणि पुरस्कार निवड समितीने घेतली. या पुरस्कारामुळे प्रयोगशील रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांनाही योग्य सन्मान मिळू शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे.

इतर पुरस्कार विजेते

  • संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत - दीप्ती भोगले

  • बुकिंग क्षेत्रातील पुरस्कार - संदीप चव्हाण

  • दिग्दर्शन क्षेत्रासाठी - विनोद रत्ना

  • संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकार - अनुष्का आपटे

  • पुरषोत्तम करंडक विजेता २०२५ - ओमकार कापसे

बालगंधर्व पुरस्कार सन - २०२०

  • ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री - निर्मला गोगटे (मुख्य पुरस्कार)

  • लेखन व दिग्दर्शन - किरण यज्ञोपवीत

  • नाट्य व्यवस्थापन - प्रवीण बर्वे

  • बॅकस्टेज आर्टिस्ट - संदीप देशमुख

  • संगीत रंगभूमीतील योगदान - रवींद्र कुलकर्णी

नव्या पिढीला रंगभूमीची आवड निर्माण करण्यासाठी विशेष योगदान अनुराधा राजहंस बालगंधर्व पुरस्कार सन - २०२१

  • शास्त्रीय संगीत गायन क्षेत्र - डॉ. रेवा नातू (मुख्य पुरस्कार )

  • व्हायोलित त्यानंतर क्षेत्रातील शिक्षिका व कलाकार - रमा चोभे

  • नाट्य व्यवस्थापन - समीर हंपी

  • बहुआयामी नाट्यकर्मी - प्रसाद वनारसे

  • बॅकस्टेज आर्टिस्ट - गणेश माळवदकर

  • बॉक्स थिएटर निर्मिती - प्रवीण वैद्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT