

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील सातारा बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गालगत टेकडीवरील डबर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या निचऱ्याच्या जागेत व गटारांमध्ये साचल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, २०१३ मधील दुर्दैवी घटनेच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
महामार्गाच्या कडेला मोठे दगड व डबर निचरा वाहून नेणाऱ्या गटारांमध्ये पडलेले असून, काही ठिकाणी काम सुरू असताना टाकण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. ही स्थिती अनेक दिवसांपासून कायम असतानाही गटारे अद्याप साफ करण्यात आलेली नाहीत. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून, वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे.
सन २०१३ मध्ये अशाच प्रकारे पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आल्याने झालेल्या दुर्घटनेत माय-लेकींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने गटारांमधील डबर व राडारोडा हटवून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोर तालुकाप्रमुख माऊली शिंदे म्हणाले, 'साधारण १२-१३ वर्षांपूर्वी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाडेकर माय-लेकींचा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. २ दिवसांपूर्वीही तत्सम परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने गटारे साफ करून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी.'
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अभियंता सुभाष घंटे म्हणाले, 'आम्ही नेमलेला ठेकेदार अर्धवट काम करून निघून गेला आहे. तातडीने दुसरा ठेकेदार नियुक्त करून संबंधित ठिकाणचा राडारोडा हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.'